महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे स्थानांतर !

मुंबई – महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे निवडणूक आयोगाने स्थानांतर केले आहे. पोलीस महासंचालक पदाचा भार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे सोपवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना महाविकास आघाडीमधील काही नेत्यांचे रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या पार्श्वभूमीवर ‘निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांचे स्थानांतर करण्यात यावे’, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. याविषयी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून आयोगाला स्मरणपत्र पाठवण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांच्या स्थानांतरानंतर लवकरच राज्यशासनाकडून नवीन पोलीस महासंचालकांचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त भार !

मुंबई – रश्मी शुक्ला यांच्या स्थानांतरानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त भार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत विवेक फणसळकर यांच्याकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे.