‘सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी (वय ८७ वर्षे) काही कालावधीसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. त्या आश्रमातील साधकांसाठी नामजपादी उपाय करत असत. ३०.७.२०२४ या दिवशी पू. प्रभुआजी साधकांसाठी नामजप करत असतांना मी त्यांच्या समवेत बसून नामजप करत होते. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. तेथे बसून नामजप करत असलेल्या काही साधकांकडून त्यांच्या शरिरावरील त्रासदायक (काळे) आवरण क्षात्रभावाने काढले जात नव्हते. त्याविषयी पू. प्रभुआजींनी साधकांच्या लक्षात आणून दिले.
२. ‘साधकांनी योग्य प्रकारे आवरण काढण्यास आरंभ केल्यावर वातावरणातील त्रासदायक शक्ती जलद गतीने दूर होत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा ‘वातावरणातील मरगळ आणि निरुत्साह दूर होऊन उत्साह अन् चैतन्य वाढले आहे’, असे माझ्या लक्षात आले.
३. पू. आजींची ‘साधकांचा त्रास लवकर दूर व्हावा आणि साधकांच्या साधनेतील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत’, अशी तीव्र तळमळ होती.
४. पू. आजी बोलत असतांना त्यांच्या वाणीत मला हलकेपणा जाणवत होता. त्यांच्या वाणीतून आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होत होती. ‘त्यांच्या बोलण्यातूनही साधकांना चैतन्य मिळत आहे.’, असे मला जाणवले. त्यांचे शब्द कानावर पडल्यावर माझ्या डोक्यावरील दाब न्यून झाला आणि मला हलकेपणा जाणवू लागला.
५. पू. आजींचा चेहरा पुष्कळ चैतन्यमय जाणवत होता. त्यांच्याकडे पाहिल्यावर माझ्या मनातील सर्व विचार दूर झाले. मला अतिशय शांत वाटून आनंद झाला.
प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच मला पू. प्रभुआजींच्या समवेत बसून नामजप करता आला. ‘पू. प्रभुआजींनी सांगितलेली सूत्रे मला माझ्या आचरणात आणून त्याचा लाभ करून घेता येऊ दे’, अशी मी गुरुचरणी आर्ततेने प्रार्थना करते.’
– कु. वेदिका भागवत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.८.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |