मालपे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात ८ वर्षीय मुलगा गंभीर घायाळ

देवगड – तालुक्यातील मालपे येथील ऋत्विक नीलेश जुवळे (वय ८ वर्षे) याला मोकाट कुत्र्यांनी अडवून त्याच्या हातांवर आणि अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी चावा घेतला. त्यामुळे तो गंभीर घायाळ झाला आहे. ही घटना ३० ऑक्टोबरला सायंकाळी घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ऋत्विक सायंकाळी घरातून शेजारी असलेल्या भातशेतीमध्ये जात होता. त्या वेळी समजीसकरवाडी येथे ४ मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर आक्रमण केले. ऋत्विक जोरजोरात आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूच्या घरातील लोक धावून आले आणि ऋत्विकची कुत्र्यांपासून सुटका केली. नंतर ऋत्विकवर फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले.

संपादकीय भूमिका 

मोकाट कुत्र्यांमुळे निर्माण होणार्‍या अशा गंभीर समस्यांवर प्रशासन वेळीच उपाययोजना का काढत नाही ?