नवी देहली – देहलीमध्ये वायू प्रदूषणामुळे राज्य सरकारने फटाके विकणे आणि फोडणे यांवर बंदी घातली आहे. असे असतांना देहलीत वायूची गुणवत्ता वाईट झाली आहे. देहलीत काही ठिकाणी हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (‘एक्यूआय’ने) ४०० एककाची पातळी ओलांडली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार देहलीत गेल्या २४ घंट्यांची सरासरी प्रदूषणाची पातळी (एक्यूआय) ३५९ होती. यंदा दिवाळीत शहरातील प्रदूषणाची पातळी पुन्हा उच्चांकावर पोचली. प्रतिकूल हवामान, शेजारील हरियाणा-पंजाब येथील शेतांतील तण जाळणे, तसेच वाहनांमधून निघणारा धूर आणि फटाके यांमुळे परिस्थिती बिकट झाली.
देहलीत पाच वर्षांपासून फटाक्यांवर बंदी !
देहली सरकारने सलग पाचव्या वर्षी फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वापर यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला देहलीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी राष्ट्रीय राजधानीत फटाक्यांवर बंदी लागू करण्यासाठी ३७७ अंमलबजावणी पथके सिद्ध केल्याची घोषणा केली होती. असे असतांनाही पूर्व आणि पश्चिम देहलीच्या भागात मोठ्या प्रमाणात निर्बंधांचे उल्लंघन झाले.