|
पणजी, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘नरकासुर प्रतिमा मिरवणुकीत आवाज मर्यादित ठेवावा आणि आवाजावर पोलिसांचे लक्ष असेल’, असा दावा शासनाकडून केला जाता होता; मात्र प्रत्यक्षात पणजी येथे, तसेच राज्यातील अन्य काही भागांतही नरकासुर प्रतिमा पहाण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला कानठळ्या बसवणार्या आवाजाला सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास असलेल्या बंदीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन झाले.
सांतइनेज येथील एका नागरिकाने राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितल्यानंतर राज्यभरातील संगीतावर नियंत्रण येईल, असे वाटत होते. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्तमानपत्रांमधून विज्ञापन प्रसिद्ध करून नागरिकांना आवाजाचा त्रास होत असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन ३ दिवसांपूर्वी केले होते, तसेच उत्तर आणि दक्षिण गोव्यात ध्वनीमापन करणारी फिरती पथके नेमली होती.
ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्याविषयी सरकारी खात्यांचे एकमेकांकडे बोट
ध्वनीप्रदूषणावर आळा घालण्यास गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल खाते आणि पोलीस यांपैकी कारवाई कुणी करावी, या सूत्रावरून एकमेकांकडे बोट दाखवणे चालूच होते. यामुळे राज्यात ठिकठिकाणी ध्वनीप्रदूषण कसे असते ? याचा प्रत्यक्षात अनुभव अनेकांनी घेतला. निवासी क्षेत्रातील ६० डेसिबल्सची मर्यादा या ठिकाणी कधीच ओलांडली होती. याविषयी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश पाटील म्हणाले, ‘‘नरकासुर प्रतिमा प्रदर्शनाच्या वेळी होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी प्रत्येक वाड्यावर पोचू शकत नाहीत. तालुक्यातील उपजिल्हाधिकार्यांनी त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. पोलिसांना ध्वनीमापन यंत्रे देण्यात आली आहेत. मध्यरात्रीनंतर संगीत वाजवल्यास पोलिसांनी ते बंद करायला पाहिजे होते.’’
नरकासुर प्रतिमा बनवणार्यांचे राजकारणी पुरस्कर्ते असल्याने प्रतिमा बनवणार्यांकडून कायद्याला वाकुल्या !
बहुतांश नरकासुर प्रतिमा करण्यासाठी राजकारण्यांनी पैसे दिले होते. नरकासुर प्रतिमा बनवणार्यांना ‘आपल्यामागे भक्कम राजकीय पाठिंबा आहे’, याची जाणीव असल्याने त्यांनी कायद्याला वाकुल्या दाखवल्या, असे दिसून आले.
संपादकीय भूमिकाअशा घटनांमुळे हिंदूंच्या सणांविषयी चुकीची प्रतिमा निर्माण होते आणि काही हिंदूच अन्य धर्मियांच्या प्रचाराला बळी पडून हिंदु धर्मापासून दूर जातात. त्यामुळे हिंदूंना आधी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! |