तेल अविव (इस्रायल) – इजिप्तने मांडलेला गाझा युद्धविराम प्रस्ताव इस्रायलने फेटाळला आहे; मात्र हमासने काही अटींसह इजिप्तचा प्रस्ताव मान्य करण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे इस्रायलने हमासच्या १०० हून अधिक सैनिकांना अटक केल्याचा दावा केला आहे. उत्तर गाझा येथील कमल अडवान रुग्णालयामध्ये धाड घालून इस्रायली सैनिकांनी त्यांना अटक केली.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फताह अल्-सिसी यांनी नुकतेच ४ इस्रायली ओलीस आणि काही पॅलेस्टिनी कैदी यांच्या बदल्यात गाझामध्ये २ दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात आला होता; मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.
लेबनॉनमधील रडवान फोर्सचा तळ नष्ट !
इस्रायली सैन्याने दावा केला आहे की, त्याच्या ‘ईगल ब्रिगेड’ने लेबनॉनमधील रडवान फोर्सचा तळ नष्ट केला आहे. इस्रायली आक्रमणामुळे लेबनॉनच्या सीमेला लागून असलेली अनेक शहरे आणि गावे उद्ध्वस्त झाली आहेत.