(टीप : अ. अज्ञेय म्हणजे अजाण आ. रुद्ध म्हणजे अडकून पडलेले)
‘अभिजात’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ‘प्रसवाच्या दिशेने जाणारे.’ ‘अभि’ म्हणजे ‘…च्या दिशेने’ आणि ‘जात’ हा शब्द प्रसव, जन्म, उगम दर्शवतो. जितके प्रसवाच्या दिशेने आपण जाऊ, तितकी शुद्धता आपल्या पदरी पडत असते आणि क्लेशही कमी होत असतात, असे पतंजलि यांनी म्हटले आहे. नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेस ‘अभिजात (समृद्ध)भाषे’चा दर्जा देऊन आपल्या देवनागरीस राजमान्यता दिली आहे. या मराठी भाषेसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, मोरोपंत, वामन पंडित या प्रभृतींनी जितके कष्ट उपसले तितकेच कष्ट स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनीही उपसले. एवढेच नाही, तर वेळोवेळी मराठी भाषेच्या शब्दसंपत्तीमध्ये भरही घातली. त्यांचे भाषाशुद्धी पुस्तक जसे मराठीचे मूळ जपण्याचा, तिचा गाभारा पारभाषिक शब्दांपासून शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करते, त्याच प्रकारे त्यांच्या कविता या आपल्या आर्यांच्या हृदयाचा ठाव घेतात. ‘अज्ञेयाचे रुद्धद्वार’ ही कविता सावरकर यांनी अंदमानमध्ये असतांना रचलेली आहे. अंदमानातील या कविता त्यांनी ‘विजनवासी’ या नावाने रचल्या. या कवितांना ते ‘रानफुले’ म्हणत असत. ‘अशी रानफुले जी काही परिस्थितीवश देवतांना वहाता आली नाहीत; पण कैदेतील प्रतिभेत जणू त्यांचा जन्म ! असे असल्या कारणाने ती ज्ञानदेवीस बळी म्हणून दिल्यासारखीच आहेत’, असे ते म्हणतात. अशाच या रानफुलांमध्ये हे कुठूनसे आलेले हे ब्रह्मकमळ !
१. स्वातंत्र्यवीर सावरकर घडले कसे ?
इटलीने ऑस्ट्रियाविरुद्ध केलेल्या सशस्त्र क्रांतीयुद्धात जोसेफ मॅझिनीने अवलंबलेल्या यशस्वी मार्गाचा यथासांग अभ्यास अगदी लहान वयातच विनायक दामोदर सावरकर यांनी केला होता. त्यामुळे विलायतेत लंडनला गेल्यावर अगदी त्वरेने मॅझिनीविषयी ऊहापोह करणार्या ६ खंडांचे (ज्यामध्ये तत्कालीन पत्रव्यवहाराचा सुद्धा समावेश आहे) अवघ्या २ आठवड्यांत वाचून काढले. एवढेच नव्हे, तर त्यावर लागलीच उणेपुरे ३०० पृष्ठांचे त्या पुण्यपुरुष मॅझिनीचे चरित्र मातृभाषेत साकारून, हिंदुस्थानात ते पाठवून, आपल्या बंधूंकडून ते छापून भारतात प्रसिद्ध केलेही ! मॅझिनीने मांडलेल्या तत्त्वज्ञानाची, त्याच्या धीरोदात्त व्रताची आणि स्वातंत्र्य अन् ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेची त्यांच्या मनाला कोण विलक्षण भुरळ पडलेली ! आणि त्यात तो मनाचा हळवेपणा, अन्यायाची चीड, विवेकी बुद्धी यांमुळे आपण त्यावर काहीतरी करायला हवे, ही जिद्द ! या सगळ्यावर कडी, म्हणजे नियतीने या सगळ्यांस दिलेली अनुकूलता. नियतीची श्रेयाविषयीची अनुकूलता ही सामान्यांच्या प्रेयसाविषयीच्या अनुकूलतेसारखी नसते ! नियती महापुरुष घडवते ते संकटे देऊन, सुखातून नव्हे ! असे काळाचे ओझे खांद्यावर वाहणारे जितश्रम पुरुष ज्या वेळी स्वतंत्रतेचे गीत गात, उदात्त ध्येय डोळ्यांसमोर ठेवून, आपल्या वैयक्तिक अभिलाषांची होळी करत प्रसन्नतेने आपला हविर्भाव या राष्ट्रायज्ञांत देतात, त्या वेळी त्यांच्या संचितातील प्रायः भोग भोगला जाऊन ते येणार्या पिढींसाठी आदर्श निर्माण करत असतात.
अशा पुरुषांना हे राजकारण; मग तो त्यांचा स्थायी भाव नसला, तरी इतिहासाच्या अनुषंगाने अभ्यासावेच लागते. एवढेच नव्हे, तर राष्ट्रोन्नतीसाठी त्यांना प्रसंगी शल्यचिकित्सकाची सुरी हाती घेऊन तद्नुकूल कठोर आचरणही करावे लागते. मन अभिजात रत्नासारखे शुद्ध ठेवून लोकहितासाठी राजकारणाचे हलाहल त्यांना पचवावेच लागते. सामान्य लोकांना जे कठोर निर्णय घेता येणार नाहीत, ते निर्णय यांनी घ्यावेत, यासाठीच तर अशा देवपुरुषांची योजना असते. त्यांच्या विशुद्ध कंठी हे राजकारणपटुत्व वैजयंती माळेप्रमाणे शोभून दिसते; कारण त्यांचा हेतू शुद्ध असतो आणि योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे प्रथम अभिलाषशून्यता येऊन नंतर कर्तव्यपूर्तीसाठी निरुपायाने त्यांनी राजकारणाचा आधार घेतलेला असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी ते राजकारण कधीच करत नाहीत. खरोखर क्रम योग्य असेल, तर काय साध्य होत नाही ?
(‘पातंजल योग’, विभूती पाद मंत्र १५ – क्रमान्यत्वं परिणामान्यत्वे हेतु:)
२. परब्रह्माचे द्वार, मुक्तीचे द्वार; पण हे द्वार अजूनही रुद्ध झाल्यासारखे !
व्यक्तीगत मोक्षाचा विचार करतांना लोकोत्तर पुरुष विचार करतात तो देव, ऋषि, पितर यांच्या ऋणांचा आणि कर्तव्य, प्रारब्ध अन् ब्रह्मकर्म यांच्या संबंधीने नियतीदत्त असलेल्या उत्तरदायित्वांचा ! सावरकर यांनी ‘कमला’, ‘विरहोच्छ्वास’ आदी महाकाव्ये अंदमानात असतांनाच लिहिली. ‘इतरांच्या आयुष्यात क्लेश असतांना स्वतः उपासनेच्या बळावर मुक्तीची इच्छा करणे, हा विचार स्वार्थीच नाही का ? ती खर्या अर्थाने मुक्ती ठरेल का ?’, असा खडा सवाल (प्रश्न) अंदमानात बसलेला हा ‘विजनवासी’ (सावरकर) करत आहे. एकेका ऋणाची उतराई करतांना, सत्याने मार्गक्रमण करता करता ते आले आहेत एका बंद द्वारापाशी ! ते आहे परब्रह्माचे द्वार, मुक्तीचे द्वार; पण हे द्वार अजूनही रुद्ध झाल्यासारखे आतून त्या अज्ञेयाने लावून घेतले आहे. अजूनही काही भोग राहिले आहेत का ? अजूनही कुठे कर्तव्यात कसूर होते आहे का ? असा विचार करत तात्याराव एखाद्या योग्याप्रमाणे आयुष्याचा आलेख त्या परब्रह्मापुढे मांडत आहेत. जिथून प्रारंभ झाला आहे, तिथेच परत जायचे हे खरे; पण हे असे सर्वार्थाने पूर्णानुभव बनून ! मगच !
३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यासाठी ईश्वराकडे मागणे
ज्या घरापासुनी मार्ग सर्व फुटणारे
येणार घरासी मार्ग त्याचि ते सारे !
ऐकोनि तुझ्या भाटांच्या
गप्पांसि गोड त्या त्यांच्या,
व्यापांसि विसावा माझ्या
जीवासि ये घरीं तुमच्या
ठोठावित थकलो ! अजुनि नुघडती बा रे ।
आंतूनि तुझी तीं बंद सदोदित दारें ।। १ ।।
या उग्र मनोभूमीत धारणा परिणत होण्याआधी त्यांनाही असेच शिकवण्यात आले होते भाटांकडून ! काय ? तर सारे काही आलबेल आहे. काही त्रास म्हणून नाही ! उपासना वाढवा ! देव सारे काही बघून घेईल ! इथे अशा गोड गोड गप्पा आणि बाहेर मात्र ही भीषण परिस्थिती ! पण स्वातंत्र्यासाठी जळणे, हे मात्र कुणी शिकवण्यास धजले नाही. ‘माझ्या आठवणी’मध्ये ते लिहितात, ‘लहानपणी जे साधूसंत प्रख्यात होते, त्यांची शिकवण ही असे की, देशावर पारतंत्र्य आले ती ईश्वरेच्छा ! ते स्वीकारावे !’ त्यावर सावरकर विचारत, ‘जर ती ईश्वरेच्छा, तर आमच्या मनात जे ती सत्ता उलथवून लावण्याचे विचार येतात ती काय राक्षसाची इच्छा ? तीही देवाची, परब्रह्माची इच्छा समजून कामाला का लागू नये ?’ इथे एक एक व्याप वाढत होते. मग ते मित्रमेळ्याचे असोत वा अभिनव भारताचे असोत ! प्रत्येक व्याप क्षणोक्षणी घेऊन मात्र येत होता या बंद द्वाराशी ! तोच काय तो मनाला विसावा ! हे ईश्वरा, मी त्या गोड गप्पांना न भुलता तुझीच सेवा आजवर करत आलो ! आता ही कर्मे हेच माझे दार ठोठावणे आहे, हे कात्या परमात्म्याला ज्ञात नाही ! पण तरी हा दरवाजा आतून बंद तो बंदच आहे !
४. योगमार्गाविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार
विस्तीर्ण अनंता भूमी
कवणाहि कुणाच्या धामीं
ठोठावित बसण्याहूनी
घेईन विसावा लव मी
येईन पुन्हा ना तुझ्या घरा ज्याची रे ।
हीं वज्र कठिणशी बंद सदोदित दारे ।। २ ।।
ही कर्माची भूमी इतकी विस्तीर्ण आहे की, बोलून सोय नाही. त्याचे इतके सूक्ष्म पदर आहेत की, विद्वानांमधील विद्वान तिथे गोंधळून जावा. त्याविषयी समर्पक उत्तरे योग्यांना सुद्धा स्वतःच शोधावी लागतात. प्रत्येक जण जो तो आपापल्या अनुभवानुसार त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. मग शेवटी ‘त्यांचे दरवाजे ठोठावून थकलेला मी तुझ्या द्वारापाशी आलो तो तेही बंदच ! आता मात्र मी तुझ्या वज्रासारख्या कठोर दारापाशी यायचे नाही, असा निश्चय केला आहे’, असे ते म्हणत आहेत आणि तरीही आपण फिरून तिथेच येणार, हेही ओळखून अशा अपरिहार्य नियतीसाठी, तिला सामोरे जाण्यासाठी स्वतःला ते खंबीर बनवतांना आपल्याला दिसतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे योगमार्गी होते. आद्यशंकराचार्यांनी जे शेवटचे अवलंबित्व जे त्या परमेश्वरावर आहे, तेही बाजूला करून ‘शिवं भूत्वा शिवं यजेत्’, म्हणजेच ‘शिव होऊन शिवाची उपासना करा’, हे सूत्र सांगितले आहे. त्या योगभूमीवर ते जणू जात आहेत, तसे आपल्याला दिसतात.
५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यामागील कारण आणि तेजाची परंपरा
ज्या गाति कथा राजांच्या
सोनेरि राजवाड्यांच्या
मी पथें पुराणज्ञांच्या
जावया घरा त्या त्यांच्या
चाललो युगांच्या क्रोशशिला गणितां रे ।
तो पथा अंति घर एक तुझें तें सारें ।। ३ ।।
आणि त्याला कारणेही अशीच होती ! येणारे दुःख म्हणजे अजून जे आलेले नाही, असे दुःख टाळण्याजोगे असते, हे सांगणारी पुराणातील राजाच्या कथा, त्यांचे वैभव त्यांना मिळवून देणारी त्यांच्या हातावरची दैवदत्त सुवर्ण रेखा तर दिसली; पण त्यासह त्याच्या मागून युगानुयुगे चाललेली क्रोशाची, म्हणजेच आक्रोशांची मालिका ! तीही नजरेसमोरून जात नाही ! तो क्रोश दूर व्हायला कुणीतरी जळायलाच हवे ! मग कुणीतरी हवेच जळायला, तर ते कुणीतरी मीच का नाही ? आणि अहो, इतिहास वाचा की ! पुराणे उघडली की, दृष्टीस पडतील ही तेजस्वी आख्याने ! कृष्णालाही काय आवश्यकता होती द्वापरयुगात या सगळ्या युद्धात पडण्याची ! छान द्वारकेत सुखाने राहू शकला असताच की तोही ! सत्ययुगात कार्तविर्याला ठार करून परशुराम शांत का बसले ! त्यांना योगशास्त्राचे ज्ञान देणारे दत्तगुरु स्वस्थ बसले का ? छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा जीवाचे रान करून हिंदु पदपादशाहीची स्थापना केली. कशाला हो ? का हो बाजीरावांनी इतका प्रचंड पराक्रम केला ? या गुरूंनी तेजाची परंपरा आखतांना त्यांनाही दिसले असेल का तेच घर ? असेच बंद दरवाजे ? ही अशीच पूर्णाहुती देऊन, कर्तव्यापूर्ती करून तो दरवाजा, ते मुक्तीचे द्वार त्यांच्यासाठी खुले झाले असेल का ?
६. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची क्रांतीच्या मार्गावर असतांना झालेली स्थिती
दुंदुभी नगारे शृंगे गर्जती ध्वनीचे दंगे
क्रांतिचे वीर रणरंगे
बेभान नाचती नंगे
जात मिसळुनी त्यांत त्या पथें जों रे ।
अंतासि उभें घर तेंचि तुझें सामोरे ।। ४ ।।
कोठून आणखी कोठे
चिंता न किमपि करिता ते
ही मिरवणूक जी मातें
नटनटुन थटुनि या वाटे
ये रिघूं तींत तों नाचतानाचता मारे ।
पथ शिरे स्मशानी ! ज्यांत तुझें ते घर रे ।। ५ ।।
मॅझिनीच्या पावलावर पाऊल टाकतांना क्रांतीचे हे नगारे जसे वाजू लागले, तसे तसे त्या वीर ध्वनीच्या गजरात मी मिसळून गेलो. त्या ध्येयाशी समरस झालो, एकरूप झालो. या कर्तव्यनिष्ठतेने मनुष्याच्या अंगी विलक्षण चैतन्य संचारत असते, याचा प्रत्ययही अनुभव घेऊन आयुष्य हे सुखलंपटतेत न घालवता कर्तव्यलंपट बनून घालवावे, हे इटलीच्या त्या युगपुरुषाने काढलेले उद्गार तात्यारावांना शब्दाश: अनुभवाला येत होते. देशासाठी आत्मत्याग केलेला हा देवपुरुष फ्रान्समध्ये सुरक्षित होता; पण दोन्हीकडे अटकेचे निर्देश निघालेले असतांनाही मी भ्यायलो, तर माझे अनुयायी तसेच भीतील, असा सत्याचरणी विचार करून सावरकर इंग्लंडला आले आणि स्वतःहून अटकेत पडले. पथ शिरे स्मशानी ! ज्यात तुझे ते घर रे ! मिरवणूक ही ती अशी ! वैराग्याचेच अलंकार जिथे उपयोगी अशा स्मशानी नेणारी !
(क्रमशः)
– श्री. आदित्य शेंडे, पुणे.
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/848060.html