१. वर्ष २००१ मध्ये भारतीय संसदेवर आक्रमण केल्याप्रकरणी महंमद अफजलला फाशी
‘वर्ष १९९३ च्या मुंबई दंगलीनंतर जिहादी आतंकवाद्यांनी संपूर्ण भारतात जवळपास २० वर्षे धुमाकूळ घातला. त्या काळात देशभरात मोठ्या प्रमाणात बाँबस्फोट आणि दंगली झाल्या. त्यात शेकडो हिंदूंच्या हत्या झाल्या आणि सहस्रो कोटी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली. पोलीस आणि संरक्षण दलातील कर्मचारी यांच्यावर आक्रमणे नित्यनेमाने होत होती. ‘इंडियन एअरलाईन्स’चे विमान अपहरण करून आतंकवाद्यांना सोडावे लागले होते. वर्ष २००१ मध्ये त्याच पाकिस्तानी जिहाद्यांनी भारताच्या लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या भारतीय संसदेवर आक्रमण केले. तेथील सुरक्षारक्षकांनी प्राणाचे बलीदान देऊन तत्कालीन खासदार, मंत्री, पंतप्रधान आणि इतर महनीय व्यक्ती यांचे रक्षण केले. या आक्रमणात ९ व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या आणि १५ जण गंभीर घायाळ झाले. या प्रकरणी महंमद अफजल, एस्.ए.आर्. गिलानी आणि इतर व्यक्तींविरुद्ध फौजदारी खटले प्रविष्ट करण्यात आले. त्याची सुनावणी विशेष न्यायालयात होऊन महंमद अफजल याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने गिलानीला निर्दोष सोडले. अफजल याची फाशी रहित करण्यासाठी त्याची पत्नी तब्बसूम हिने दयेचा अर्ज (आवेदन) केला; पण तिचा अर्ज तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळला. त्यानंतर तथाकथित बुद्धीवादी मंडळी, चित्रपटातील व्यक्ती आदींनी अर्ज करून राष्ट्रपतींना फेरविचार करण्यास सुचवले.
२. महंमद अफजलची शिक्षा न्यून करण्याच्या मोहिमेत देहलीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या पालकांचा सहभाग
‘महंमद अफजलची फाशी रहित करून त्याला जन्मठेप व्हावी’, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यात देहलीच्या सध्याच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या पालकांनी फार सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणे, सर्वोच्च न्यायालयात याचिका करणे; एवढेच नव्हे, तर अफजल याला फाशी दिल्यानंतर न्यायव्यवस्था, भारतीय अन्वेषण यंत्रणा आणि भारत सरकार यांवर टीका करणारे लिखाण केले. त्यात एस्.ए.आर्. गिलानी याला चुकीच्या पद्धतीने कसे गोवण्यात आले आणि त्याची किती छळवणूक झाली, हेही सांगितले.
याही पुढे जाऊन अफजल याला फाशी दिल्यानंतर १८.९.२०१६ या दिवशी त्याच्या स्मरणार्थ देहलीच्या प्रेस क्लबमध्ये आतिशीच्या पालकांनी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. त्यात ‘एक अफजल मेल्याने काय फरक पडणार ? असे सहस्रो अफजल निर्माण होतील’, ‘काश्मीरला स्वातंत्र्य हवे’, अशा पद्धतीच्या प्रक्षोभक राष्ट्र्रविरोधी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे संयोजन आतिशी यांच्या पालकांनी केले होते. त्यासह पालक त्या व्यासपिठावरही बसले होते.
३. आतिशीकडून पालकांच्या राष्ट्रविरोधी कृत्याचे समर्थन
आतिशी यांना ‘महिला मुख्यमंत्री’, ‘तरुण मुख्यमंत्री’ यांसारखी जी विशेषणे लावण्यात आली, ती या पार्श्वभूमीवर किती योग्य आहेत ?, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्यांचे आई-वडील देशविरोधी कृत्यात सहभाग घेतात, त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करणे कितपत योग्य आहे ? महंमद अफजलच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात राष्ट्र्रद्रोही घोषणा दिल्याविषयी आतिशीला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘पालकांना त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे आणि त्याविषयी मी काही म्हणू शकत नाही. तो त्यांचा विचार आहे.’
थोड्या दिवसांतच देहली विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देतांना काही अटी सांगितल्या आहेत. त्यांचे पालन करतांना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली असती. त्यामुळे केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्याच्या जागेवर ‘डमी’ उमेदवार बनू शकणार्या आतिशीचे नाव सुचवले. येत्या विधानसभा निवडणुकीत आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ उभे रहाणार्या लोकांच्या पक्षाला निवडून द्यायचे का ?, हे मतदारांनी ठरवले पाहिजे. वास्तविक इस्रायलसारखे प्रखर राष्ट्रप्रेम दाखवून अशा राष्ट्रद्रोह्यांना कायमस्वरूपी घरी बसवले पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमी लोकांना वाटते.’ (२९.९.२०२४)
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय