आईपण आणि आरोग्य

‘डॉक्टर आयुष्यात कधी गुडघे दुखले नाहीत हो माझे. बाळ आता जेमतेम ३ महिन्यांचे होत आहे, तरी गुडघे ताठ करतांना हाताने आधार देऊन सरळ करायला लागतात’, हे चाळीशीला आलेली नव्यानेच आई झालेली रुग्ण बोलत होती. तिच्या बोलण्यात निराशा, आश्चर्य आणि हळहळ हे तीनही दिसत होते. ‘लवकर लग्न करून लवकर बाळ होऊ दिले असते, तर बरे झाले असते’, असे ती परत परत सांगत होती.

१. मूल होण्यासंबंधी सध्याच्या मुलींची विचारप्रक्रिया आणि त्यामुळे उद्भवणार्‍या शारीरिक समस्या

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

आई होणे आणि बाळंतपण निभावणे या दोन्ही गोष्टी पुष्कळ दायित्वाच्या अन् विशेषतः स्त्रीच्या शरिराकडून बर्‍याच अपेक्षा ठेवणार्‍या आहेत. आपल्या कुठल्या वयाला काय प्राधान्य ठेवायला हवे, हा विचार बर्‍याचदा नसतो. नोकरीमध्ये अगदी नीट स्थिरस्थावर झालेल्या २५ ते ३० वर्षांच्या मुली अजून ‘जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, वेळ हवा आहे म्हणून सध्या लग्नाचा विचार नाही किंवा थांबलो आहे’, असे म्हणतात, तेव्हा आश्चर्य वाटते. या ठिकाणी पुढे येणार्‍या नैसर्गिक अडचणी (मासिक पाळीच्या संबंधी उद्भवणार्‍या समस्या, गर्भधारणेतील अडचणी, ‘हार्माेन्स’ (संप्रेरक)चे असंतुलन) त्यांना वेळीच सांगितल्या जायला हव्यात.

शिक्षण झाल्यावर लगेच लग्न कोण करते ? किंवा लग्न झाल्यावर लगेच कसे मूल जन्माला घालायचे ? हे दोन्ही विचार त्या त्या परिस्थितीत एकदम योग्य वाटले, तरी नंतर शारीरिकदृष्ट्या सर्वांना तेवढे सुलभ जात नाही. काम, लग्न, मूल आणि आरोग्य यांचा समन्वय आवश्यक असतो अन् त्याचा विचार योग्य वयात झाला, तर सोपे जाते. एकत्र कुटुंबपद्धत न्यून होत चालल्याने एका पालकावर बराच ताणही येतो. या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून सध्या सगळेच डॉक्टर ‘मूल होऊ द्यायचे असेल, तर शक्यतो थांबू नका’, असा सल्ला देतात. लग्नाआधी प्रकृतीकडे पूर्ण लक्ष देऊन ती व्यवस्थित ताब्यात ठेवली गेली असेल, तर मात्र उशिरा मूल झाले, तरी काही स्त्रिया हे सहज निभावून नेतात; पण अशी उदाहरणे फारच अपवादात्मक. वय अधिक असता त्यातच स्त्रीचे शरीर हे बाळ सांभाळून थकलेले असतांना, तसेच कामाला प्रारंभ करायला लागल्याने वाताचा आत्यंतिक प्रकोप होतांना दिसतो. त्यात मग अंग आंबणे (शरीर दुखणे), जड होणे, सांधे दुखणे, केस गळणे, अंग दुखणे, वजन परत आटोक्यात न येणे आणि त्यातून येणारी निराशा कंटाळा अन् चिडचिड असे विविध त्रास होतांना दिसतात.

२. महिलांनी बाळंतपणापूर्वी अन् नंतर घ्यावयाची काळजी 

या सर्व समस्या न व्हाव्यात, यासाठी प्राधान्याचा विचार आणि तसे नाहीच झाल्यास आयुर्वेदात सांगितलेले अत्यंत उत्तम असे काढे अन् काही सोप्या औषधी यांचा विचार नक्की करावा. या उपायांचा मूळ उद्देश ‘वात बाहेर काढणे आणि पोट जागेवर आणून आईला लवकरात लवकर उत्तम शक्ती देणे’, हा आहे.

अ. लग्नानंतर मूल होण्याआधी पंचकर्म करून घेणे.

आ. कटाक्षाने वजन वाढू न देण्याविषयी प्रयत्न करणे.

इ. वार्षिक वैद्यकीय चाचण्या करून दडून राहिलेले आजार शोधून काढणे.

ई. बाळंतपण झाल्यावर वैद्यकीय सल्ल्याने काही औषधे आणि काढे घेणे.

उ. किमान ४५ दिवस गार पाण्यात, वातानुकूलित यंत्राच्या खाली, पावसात आणि थंड ठिकाणी फिरायला जाणे टाळणे.

ऊ. अंगाला तेल लावून विशेषतः सांधे आणि पाठीचा कणा यांना शेकणे.

ए. अस्थी धातू पोषक आहार विहार – यात डिंक, अहळीव, खोबरे, दाणे, तूप, दूध इत्यादी घेणे.

ऐ. सुंठ, ओवा, बडीशेप, बाळंतशेप, हिंग या औषधांचा यथायोग्य उपयोग करावा.

ओ. पायमोजे आणि कानात बोळे विशेष करून पावसाळा अन् हिवाळा असतांना वापरावेत.

औ. मूल झाल्यावर वार्षिक पंचकर्म करून घेणे.

या काही गोष्टी पाळल्या असता शरीर लवकर पूर्वपदावर यायला साहाय्य होते. परिस्थितीप्रमाणे मूल ज्या वयात होईल, तेव्हा या काळजी घेतल्या, तर दूरगामी दुष्परिणाम नक्कीच टळतात.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.