Bareilly False Rape Case : बलात्काराचा आरोप निघाला खोटा; तरुणीला शिक्षा !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील एक तरुण बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली ४ वर्षे कारागृहात होता. तरुणी खोटे बोलत असल्याचा न्यायालयाला संशय आल्यानंतर तिची कसून चौकशी करण्यात आली. यात तिने तरुणावर केलेला बलात्काराचा आरोप खोटा असल्याचे सिद्ध झाले. यानंतर न्यायालयाने तरुणाची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करत तरुणीला थेट कारागृहात पाठवले. ‘निरपराध तरुणाला खोट्या आरोपाखाली जशी शिक्षा भोगावी लागली, तशीच शिक्षा आरोप करणार्‍या तरुणीला भोगावी लागेल’, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने पीडित तरुणाला ५ लाख रुपये देण्याचा आदेशही आरोपी तरुणीला दिला. जर तरुणीने ५ लाख रुपये दंड भरण्यास नकार दिला, तर तिची शिक्षा ६ महिन्यांनी वाढवावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

न्यायालयाच्या निर्णयावर पीडित तरुण अजय उपाख्य राघव याने समाधान व्यक्त केले आहे.तो म्हणाला, ‘‘न्यायालयात आरोपींवरील आरोप खोटे ठरले, तरी समाज त्याच्याकडे त्याच दृष्टीकोनातून पहातो. सदर मुलीच्या एका आरोपामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली.मी कुठेही गेलो, तरी लोक माझ्याकडे संशयाने पहातात.’’

असा समोर आला तरुणीचा खोटारडेपणा !

न्यायालयात साक्ष देतांना तरुणी गडबडल्याने तिचा खोटारडेपणा उघडकीस आला. तिने प्रथम न्यायाधिशांसमोर स्वतः निरक्षर असल्याचे सांगितले आणि नंतर इंग्रजीत स्वाक्षरी केली. ती खोटे बोलत असल्याचे न्यायाधिशांना समजले. यानंतर तिच्या विरोधात खोटी साक्ष दिल्याविषयी गुन्हा नोंदवून तिला शिक्षा देण्यात आली.