Ahmedabad Gujarat : बनावट न्‍यायाधिशाने भूमीच्‍या प्रकरणांचे निकाल देऊन १०० एकर भूमी बळकावली !

  • गांधीनगर (गुजरात) येथील धक्‍कादायक घटना

  • बनावट न्‍यायाधिशाला अटक

  • डोळे विस्‍फारणार्‍या अशा घटनांतून भारत हा ‘रामभरोसे’च चालू आहे, असेच म्‍हटले पाहिजे !

मॉरिस सॅम्‍युअल

गांधीनगर (गुजरात) – येथील एका व्‍यक्‍तीने बनावट न्‍यायालय उभारून काही प्रकरणांचे निकाल दिले आणि कोट्यवधी रुपयांची तब्‍बल १०० एकर सरकारी भूमीही बळकावली. मॉरिस सॅम्‍युअल असे या व्‍यक्‍तीचे नाव असून तिने बनावट न्‍यायाधीश बनून निकाल दिले. गांधीनगरमधील त्‍याच्‍या कार्यालयात न्‍यायालयासारखे वातावरणच बनवण्‍यात आले होते. विशेष असे की, गेल्‍या ५ वर्षांपासून हे बनावट न्‍यायालय चालू होते. कर्णावती पोलिसांनी नुकतेच मॉरिसला बनावट न्‍यायाधीश बनवून लोकांची फसवणूक केल्‍याप्रकरणी अटक केली.

अशी केली फसवणूक !

१. मॉरिसने येथील इंदिरानगरमधील एका घरात कार्यालय चालू केले होते.

२. तो त्‍याच्‍या मित्रांना बनावट अधिवक्‍ता म्‍हणून सुनावणीसाठी उभे करत असे. ज्‍या लोकांचे भूमीशी संबंधित वादाचे खटले शहर दिवाणी न्‍यायालयात प्रलंबित होते, अशांना तो गोवत असे. त्‍यांना या अधिवक्‍त्‍यांचे अशील बनवून त्‍यांच्‍याकडून पैसे लाटत असे.

३. मॉरिसने स्‍वत:चे अधिकृत न्‍यायालय-नियुक्‍त मध्‍यस्‍थ म्‍हणून वर्णन केले होते.

४. मॉरिस याने ११ हून अधिक प्रकरणांमध्‍ये बनावट अधिवक्‍त्‍यांच्‍या अशीलांच्‍या बाजूने आदेश पारित करून त्‍यांच्‍याकडून पैसे लाटले.

कसा पकडला गेला मॉरिस ?

वर्ष २०१९ मध्‍ये मॉरिस याने एका व्‍यक्‍तीच्‍या बाजूने आदेश दिला होता. हे प्रकरण जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अखत्‍यारीतील सरकारी भूमीशी संबंधित होते. मॉरिसचा मित्र असणार्‍या एका अधिवक्‍त्‍याच्‍या अशिलाने (ग्राहकाने) त्‍यावर दावा केला. मॉरिसने बनावट न्‍यायालयीन कार्यवाही चालू केली आणि अशिलाच्‍या बाजूने आदेश मिळवला. जिल्‍हाधिकार्‍यांना त्‍या भूमीच्‍या कागदपत्रांमध्‍ये अशिलाचे नाव नोंदवण्‍याचे निर्देश दिले. या आदेशाची कार्यवाही करण्‍यासाठी मॉरिसने अन्‍य अधिवक्‍त्‍यांच्‍या माध्‍यमातून दिवाणी न्‍यायालयात अपील केले. तथापि खर्‍या न्‍यायालयाचे रजिस्‍ट्रार हार्दिक देसाई यांना आढळले की, मॉरिस हा लवाद नाही किंवा न्‍यायाधिकरणाचा आदेश खरा नाही. त्‍यातून त्‍याच्‍या बनावट न्‍यायालयाचा पर्दाफाश झाला.