Bagmati Express Accident : रुळाचे नटबोल्ट काढल्याने बागमती एक्सप्रेसला अपघात झाल्याचे उघड !

बागमती एक्सप्रेस अपघात (संग्रहित छायाचित्र)

चेन्नई – मैसुरूहून बिहारमधील दरभंगा येथे ११ ऑक्टोबरला निघालेली बागमती एक्सप्रेस रुळावरून घसरून शेजारच्या रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली होती. या अपघातामागचे कारण रेल्वे विभागाच्या अन्वेषणात उघड झाले आहे. कवरैपेटे स्थानकाजवळ घडलेल्या या अपघाताच्या ठिकाणी रेल्वे रुळाचे नटबोल्ट हेतूपुरस्सर काढण्यात आल्याचे उघड झाले आहे. या अपघातात २० जण घायाळ झाले होते.

रेल्वे सुरक्षा आयुक्त ए.एम्. चौधरी यांच्यासमोर चौकशीसाठी उपस्थित असलेल्या ट्रॅकमन, ट्रेनचालक (लोकोपायलट), ‘स्टेशन मास्टर’ यांच्यासह १५ रेल्वे कर्मचार्‍यांनी या अपघातामागे कोणताही तांत्रिक दोष नसल्याचे सांगितले; परंतु रुळाचे नटबोल्ट हेतूपुरस्सर काढण्यात आल्याच्या गोष्टीला त्यांनी स्वीकृती दर्शवली. रेल्वे रुळाचे ६ नटबोल्ट काढण्यात आले होते, असे रेल्वे पोलीस विभागाचे साहाय्यक आयुक्त कर्णन यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

असे कृत्य करणार्‍या समाजकंटकांना शोधून काढून फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !