पुणे येथील ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानका’ला आग !

वेल्डिंगचे काम चालू असल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज !

मेट्रो स्थानकाला आग लागली असतांनाचे दृश्य !

पुणे – नुकतेच उद्घाटन झालेल्या ‘महात्मा फुले मंडई ‘मेट्रो’ स्थानका’ला आग लागल्याची घटना घडली आहे. २० ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही आग लागल्याचे समजते. आगीची माहिती मिळताच अग्नीशमनदलाच्या ५ गाड्यांनी आग नियंत्रणात आणली. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी मेट्रो स्थानकाची मोठी हानी झाल्याचे समजते. या ‘मेट्रो’ स्थानकाच्या तळघरामध्ये वेल्डिंगचे काम चालू होते. त्यातून तिथे असलेल्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. अग्नीशमनदलाच्या कर्मचार्‍यांनी श्वसनरहित उपकरणांचा उपयोग करून आग आटोक्यात आणली. वेल्डिंगचे काम चालू असल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज करण्यात आला आहे.

मेट्रो सेवेवर परिणाम नाही ! – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

आग लागल्याचे समजताच महापालिकेच्या अग्नीशमनदलाने आगीवर नियंत्रण आणले. ही घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली आहे. या संदर्भात ‘मेट्रो’चे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. या घटनेचा ‘मेट्रो’ सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे ‘मेट्रो’ प्रशासनाने कळवले असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘एक्स’द्वारे (पूर्वीचे ट्विटर)  दिली आहे.