रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणार्‍या ४०० पोलिसांवर दंडात्मक कारवाई !

प्रयागराज – सामान्य माणूस जर रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करतांना आढळला, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते; मात्र पोलीसदलात कार्यरत असणारे कर्मचारी विनातिकीट प्रथम दर्जाच्या डब्यात प्रवास करतांना आढळले आहेत. उत्तरप्रदेशमधील प्रयागराज रेल्वे विभागाने अशा विनातिकीट प्रवास करणार्‍या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागच्या ६ महिन्यात विविध रेल्वे विभागातून विनातिकीट प्रवास करणार्‍या ४०० पोलिसांना दंड भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी विनातिकीट प्रवास करणार्‍यांच्या विरोधात मोहीम चालू केली होती. त्यात अनेक पोलीस वातानुकूलित डब्यात प्रवास करतांना आढळून आले. या पोलिसांमुळे इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता.

‘भारतीय रेल्वे तिकीट तपासणी संघटने’चे विभागीय सचिव संतोष कुमार म्हणाले, काही पोलीस अधिकारी त्यांच्या अधिकारांचा अपवापर करून वातानुकूलित डब्यातून प्रवास करतात. कधी कधी तर हे पोलीस अधिकारी प्रवासी आणि रेल्वेचे कर्मचारी यांनाही  धमकावतात.

संपादकीय भूमिका

अशा फुकट्या पोलिसांना रेल्वेत विनातिकीट प्रवास करू देणार्‍या रेल्वेच्या उत्तरदायी अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !