थोडक्यात महत्त्वाचे : ५ लाख रुपयांचे मॅफेड्रोन कह्यात !… वाशी येथील तिसरा उड्डाणपूल सर्वांसाठी चालू !…

५ लाख रुपयांचे मॅफेड्रोन कह्यात !

नाशिक – चारचाकी गाडीतून विक्रीसाठी नेत असलेल्या ५ लाख रुपयांचा मॅफेड्रोन या अमली पदार्थांचा साठा नाशिक अमली पदार्थविरोधी पथकाने कह्यात घेतला आहे. या प्रकरणी दोघांसह एका महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. फैसल शेख, शिबान शेख आणि शिबानची पत्नी हिना शेख अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या वाहनाची झडती घेतली होती.

संपादकीय भूमिका : अमली पदार्थ बाळगणार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !


वाशी येथील तिसरा उड्डाणपूल सर्वांसाठी चालू !

नवी मुंबई – वाशी येथील तिसरा उड्डाणपूल १५ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी चालू करण्यात आला आहे. यामुळे वाहतूककोंडीची समस्या अल्प होण्याची शक्यता आहे.


शिक्षण संस्थेच्या संचालकांना लाच घेतांना पकडले !

कल्याण – शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक, तसेच सहसचिव चंद्रकांत हरिभाऊ धानके (वय ६० वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका शिक्षकाकडून १ लाख १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले.

संपादकीय भूमिका : अशांची सर्व संपत्ती  जप्त का करू नये ?


सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक !

मुंबई – माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणी चौथ्या आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली आहे. हरिकुमार बलराम (वय २३ वर्षे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशातील बहराईच येथील रहिवासी आहे. तो पुण्यातील भंगारच्या दुकानात काम करत होता. या कटात त्याचा सहभाग असून त्याने पैशांचे आणि इतर साहाय्य केल्याचे अन्वेषणातून निष्पन्न झाले आहे.


कर न भरणारा पेट्रोल पंप ‘सील’

कल्याण-डोंबिवली पालिकेची कारवाई

कल्याण – नियमित नोटिसा बजावूनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणार्‍या कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील रोशन पेट्रोल पंप ‘सील’ करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ही कारवाई केली. पेट्रोल पंपाच्या मालकाकडे मालमत्ता कराची पालिकेची ९५ लाख १४ सहस्र रूपयांची थकबाकी आहे.