कार्तिक यात्रेच्या कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या ! – सचिन इथापे, प्रांताधिकारी, पंढरपूर

बैठकीला उपस्थित अधिकारी

पंढरपूर – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून, तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. १२ नोव्हेंबर या दिवशी कार्तिकी एकादशी असून यात्रेचा कालावधीत २ ते १५ नोव्हेंबर असा आहे. यात्रा कालावधीत ६५ एकर (भक्तीसागर) येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन गर्दीच्या व्यवस्थापनाविषयी सूक्ष्म नियोजन करावे. यात्रेत येणार्‍या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित विभागाने घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या. (अशा सूचना का कराव्या लागतात ? याचा प्रशासनातील अन्य अधिकार्‍यांनी विचार करावा ! – संपादक)

कार्तिकी यात्रेच्या कालावधीत भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी प्रशासनाकडून करण्यात  येणार्‍या नियोजनाविषयी प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस पोलीस, नगरपालिका, मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रांताधिकारी इथापे पुढे म्हणाले, ‘‘या कालावधीत नगरपालिकेने पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा मुबलक पाणीपुरवठा करावा, वाळवंटातील, तसेच शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत. वाळवंटात पुरेसा प्रकाश राहील याविषयी नियोजन करावे, धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. अनधिकृत फलक काढावेत, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंदिरे समितीने आणि नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरीकेडींग करावे अन् अग्नीशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी. कार्तिकी यात्रेच्या कालावधीत मंदिर समितीने अधिकचे पत्राशेड उभारावेत, दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. मंदिरात, तसेच मंदिराभोवती करण्यात येणार्‍या विद्युत् रोषणाईचे ‘फायर ऑडीट’ आणि ‘स्काय वॉक’चे ‘स्ट्रॅक्चरल ऑडीट’ करून घ्यावे.’’

या वेळी मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्रोत्री म्हणाले, ‘‘४ नोव्हेंबरला श्रींचा पलंग काढून प्रक्षाळपूजेपर्यंत म्हणजे २० नोव्हेंबर या कालावधीत २४ घंटे श्रींचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कालावधीत पत्राशेड येथे पूर्णवेळ अन्नछत्र चालू ठेवण्यात येणार आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले.’’

यात्रेच्या कालावधीत येणार्‍या भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी कूपनलिका, हातपंपाची पाणी पडताळणी करण्यात येत आहे. पावसामुळे शहरात पडलेले खड्डे बुजवण्याचे काम चालू असून स्वच्छतेसाठी अधिक हंगामी स्वच्छता कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. – सुनील वाळूजकर, उपमुख्याधिकारी, नगरपालिका