बस्तरचा दसरा हा श्रीरामाशी संबंधित नाही, तर बस्तरची कुलदेवता असलेल्या दंतेश्वरी देवीचा उत्सव म्हणून तो येथे साजरा साजरा करतात. हा सण एक-दोन नव्हे, तर चक्क ७५ दिवस साजरा केला जातो. येथे रावणदहन नसते, तर देवीची मिरवणूक काढली जाते. बस्तरचा दसरा हा सगळ्या राज्यांत प्रसिद्ध आहे.
१. श्रावण अमावास्येला प्रारंभ आणि आश्विन शुक्ल त्रयोदशीला समाप्ती !
येथील दसरा सणाचा प्रारंभ इ.स.च्या १५ व्या शतकात काकतीय राजा पुरुषोत्तम देव याने केला. या उत्सवातील प्रमुख परंपरा, कार्ये ही काकतियांची कुलदेवता असलेल्या दंतेश्वरी देवीच्या उपासनेशीच निगडित आहेत. पंचमीच्या दिवशी बस्तरचे राजे देवीला जगदलपूरला येण्यासंबंधी आमंत्रण देतात. देवीला वाजत गाजत जगदलपूरला नेतात. बस्तरचे आदिवासी देव घेऊन अष्टमीला जगदलपूरला पोचतात. तेथे देवीची मिरवणूक काढली जाते. हा सोहळा श्रावण अमावास्येला चालू होऊन आश्विन शुक्ल त्रयोदशीला संपतो. ७५ दिवसांमधील शेवटचे १० दिवस महत्त्वाचे असतात.
२. देवीला काट्यांच्या गादीवर बसवणे
या उत्सवातील एक विधी म्हणजे ‘देव झुलनी’ ! त्याचा प्रारंभ होतो ‘काछिन गादी’ नावाच्या उत्सवाने ! याचा अर्थ देवीला काट्यांच्या गादीवर बसवणे आणि तिची दसरा उत्सवासाठी अनुमती घेणे. या वेळी देवी संदेश देते की, आयुष्यात येणार्या काट्यांवर म्हणजेच संकटांवर सहजगत्या मात करा.
३. काछिनदेवीचा कुमारिकेत संचार !
या देवीचा संचार मिरगान जातीतील कुमारिकेच्या अंगात होतो. आश्विन अमावास्येच्या दिवशी काछिन गादीचा कार्पाम आयोजित केला जातो. राजा किंवा राजाचा प्रतिनिधी जल्लोषात, वाजत गाजत जगदलपूरच्या पथरागुडौ मार्गावरील ‘काछिन गुडी’ येथे येतात. या दिवशी दंतेश्वरी देवीच्या पुजार्यांच्या हस्ते कार्पामाचे संचालन केले जाते. प्राचीन समजूत अशी आहे की, ही काछिनदेवी धनधान्याची वृद्धी आणि रक्षण करते. या कार्पामात देवीचा परमभक्त सिरहादेवीला आवाहन करतो आणि त्या देवीचा संचार कुमारिकेच्या अंगात होतो. कुमारिकेला काट्यांच्या झोपाळ्यावर झोपवून सिरहा तिला झोके देतात. देवीची पूजा करून तिच्याकडे दसरा उत्सवाची अनुमती मागितली जाते. काछिन देवीने उत्सवाला अनुमती देऊन भक्तांना प्रसाद दिल्यावर बस्तरच्या दसर्याचा धूमधडाक्यात प्रारंभ होतो. रथोत्सव हाही या उत्सवाचा एक भाग आहे. देवतेची पूजा, तिला अर्पण करायच्या विविध वस्तू, मंदिराची प्रदक्षिणा, योगाचार, आदिवासी प्रमुखांची परिषद अशा विविध गोष्टी या उत्सवात केल्या जातात. सगळ्यात शेवटी देवीला मिरवत परत आपल्या गावी नेण्यात येते.
– श्री. आशुतोष बापट (साभार : दैनिक ‘सामना’)