विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीची पोलिसांत तक्रार !
पंढरपूर – येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या भक्तनिवासामधील खोल्यांची आगाऊ नोंदणी करून भाविकांची आर्थिक फसवणूक करणार्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
१. मंदिरे समितीचा सर्व्हे क्रमांक ५९ येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास आहे. भक्तनिवासामध्ये खोली नोंदणीसाठी www.yatradham.org या संकेतस्थळावरून ‘ऑनलाईन’ सुविधा उपलब्ध आहे. ‘ऑफलाईन’ पद्धतीने प्रत्यक्ष येऊन नोंदणी सुविधा उपलब्ध आहे.
२. तथापि श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाच्या नावाने www.Shrivitthalrukminibhaktnivas.in असे खोटे (फेक) संकेतस्थळ (वेबसाईट) करून त्यावर भ्रमणभाष क्रमांक ९०४५०३३७१९ वरून खोल्या आगाऊ नोंद केल्या जातात, असे सांगून भाविकांचे पैसे स्वीकारले आहेत. अशा भाविकांना त्याची पावतीही दिली गेली आहे.
३. ६ ऑक्टोबर या दिवशी अशा भाविकांनी भक्तनिवास येथील भ्रमणभाषवर संपर्क केला असता ही गोष्ट निदर्शनास आली.
४. काही भाविक भक्तनिवास येथे प्रत्यक्ष वास्तव्यास आले असता फसवणूक झाल्याची माहिती मिळाली.
५. भाविकांची फसवणूक होऊ नये, तसेच फसवणूक झालेल्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी समितीने पोलीस ठाणे, पंढरपूर शहर आणि www.cybercrime.gov.in यांच्याकडे मंदिर समितीच्या वतीने लेखी तक्रार देण्यात आली आहे.
६. भाविकांनी www.yatradham.org या संकेतस्थळाद्वारे किंवा ऑफलाईन पद्धतीने खोलीची नोंदणी करावी, असे आवाहन मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका :पंढरपूरप्रमाणे अन्य ठिकाणीही भाविकांची आर्थिक फसवणूक होत नाही ना ? याचे अन्वेषण करायला हवे ! |