७ ऑक्टोबर १९०५… दसर्याचा दिवस होता तो; पण या दिवशी पुण्यात मात्र साजरी झाली ती होळी ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली साजरी झालेली ‘पहिली परदेशी कपड्यांची होळी.’
१. परदेशी कपड्यांची होळी करण्याची योजना आणि लोकमान्य टिळक यांची अट !
वर्ष १९०२ मध्ये सावरकर शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. नाशिकमधील तरुणांमध्ये क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवण्यात यशस्वी झालेले सावरकर आता पुण्यातील तरुणांना क्रांतीची दीक्षा देणार होते. आपली लेखणी आणि वाणी यांच्या प्रभावाने त्यांनी पुणेकरांना जिंकले होते. राजकीय आणि सामाजिक सभा, संमेलने यांमध्ये सावरकर यांचे विचार ऐकायला गर्दी होत होती. सावरकर हे स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. ‘स्वदेशीचा पुरस्कार, म्हणजेच परदेशी मालावर बहिष्कार’, या विचाराने १ ऑक्टोबरला भरलेल्या सभेत सावरकर यांनी देशबांधवांना विदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचे आणि दसर्याच्या दिवशी परदेशी कपड्यांची होळी करण्याचे आवाहन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यसम्राट न.चिं. केळकर होते. काळकर्ते शिवरामपंत परांजपे सभेला उपस्थित होते. सर्वांनीच सावरकर यांच्या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘कपडे जाळून वाया घालवण्यापेक्षा ते कपडे गरिबांना वाटावेत’, असा विचार न.चिं. केळकर यांनी मांडला; पण सावरकर यांना हा विचार पटला नाही. या होळीची इंग्लंडपर्यंत पोचणारी धग सावरकर यांना अधिक महत्त्वाची वाटत होती. या सभेच्या दिवशी लोकमान्य टिळक पुण्यात नव्हते. ते परत येताच सावकार यांनी टिळक यांना स्वतःची योजना सांगितली. टिळक यांनी त्याला मान्यता दिली; पण ‘थोडेथोडके नाही, तर ढिगाने कपडे गोळा झाले पाहिजेत’, अशी अट घातली. सावरकर यांनी ती अट मान्य केली.
२. प्रत्यक्ष परदेशी कपड्यांची होळी आणि ब्रिटिशांना त्याचे बसलेले चटके !
आपल्या संघटन कौशल्याने सावरकर यांनी अनेक तरुणांना या कार्यासाठी उद्युक्त् केले, ढिगाने कपडे जमा झाले. विदेशी कपडे भरलेल्या गाडीची मिरवणूक निघाली. मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात लोकमान्य टिळक मिरवणुकीत सहभागी झाले. लकडी पुलापलीकडे होळी पेटणार होती. टिळक यांनी सुचवले, ‘होळीच्या ठिकाणी भाषणे न घेता ती दुसर्या ठिकाणी घ्यावीत.’ सावरकर यांना हे मान्य नव्हते. ‘होळीसमोर भाषणे झाली नाहीत, तर त्याचा अपेक्षित परिणाम साधणार नाही’, हे सावरकर यांचे म्हणणे टिळक यांनी मान्य केले आणि दसर्याच्या दिवशी पुण्यात झाली परदेशी कपड्यांची होळी ! ‘स्वदेशी वस्तूंच्या पुरस्कारासाठी तरुणांनी चालू केलेली ही चळवळ नक्की यशस्वी होणार’, असा आशीर्वाद टिळक यांनी दिला. शिवरामपंत परांजपे यांच्या जळजळीत, उपरोधिक भाषणाने त्या होळीत जणू तेलच ओतले गेले. या होळीचे चटके ब्रिटिशांना लंडनमध्येही जाणवले.
३. परदेशी कपड्यांच्या होळीमुळे सावरकर यांना निंदा सहन करण्यासह दंड भोगावा लागणे
ब्रिटीश सरकार हादरले. सावरकर यांचे हे ‘जहाल’ कृत्य फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘मवाळां’ना झेपणारे नव्हते. ‘इंदूप्रकाश’ या मुखपत्रात सावरकर यांची निंदा करण्यात आली. फर्ग्युसनचे प्राचार्य र.पु. परांजपे यांनी सावरकर यांना महाविद्यालयाच्या वसतीगृहातून काढले आणि त्यांना १० रुपये दंडही ठोठावला. याविरुद्ध महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. लोकमान्य टिळक यांनी तर ‘हे आमचे गुरुच नव्हेत’, या मथळ्याचा लेखच लिहिला. त्या काळानुरूप पुष्कळच वाटणारा दंड भरण्यासाठी मुलांनी वर्गणी गोळा केली; पण सावरकर यांनी जमा झालेली रक्कम ‘पैसा फंड’ आणि इतर काही संस्था यांना देणगी म्हणून दिली अन् स्वतःच दंड भरला.
४. म. गांधींनी केलेली टीका आणि त्यांनी १७ वर्षांनी विदेशी कपड्यांची होळी करणे
दक्षिण आफ्रिकेत असणार्या म. गांधींनी या होळीवर टीका केली. ‘इंग्लंडशी असणार्या आपल्या संबंधांना यामुळे इजा पोचते. त्यामुळे बहिष्काराच्या या चळवळीत द्वेष आणि हिंसा दोन्ही आहे’, असे गांधी आणि त्यांचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांचे मत होते. या घटनेनंतर १६ वर्षांनी मतपरिवर्तन झालेल्या गांधींनी वर्ष १९२१ मध्ये मुंबईत विदेशी कपड्यांची होळी केली.
वर्ष १९०५ मध्ये दसर्याच्या दिवशी स्वदेशीच्या पुरस्कारार्थ झालेल्या विदेशी कपड्यांच्या होळीचे जनक ठरले स्वातंत्र्यवीर सावरकर ! राजकारणासाठी शिक्षण संस्थेच्या वसतीगृहातून हकालपट्टी झालेले सावरकरच ठरले ‘पहिले’ विद्यार्थी !
– सौ. मंजिरी मराठे, कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई. (७.१०.२०२४)