दौंडचे पशूवधगृह बंद न झाल्यास उग्र आंदोलन करू ! – महंत रामगिरी महाराज यांची चेतावणी

दौंडचे पशूवधगृह भुईसपाट करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आला मोर्चा !

दौंड येथील पशूवधगृह भुईसपाट करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

दौंड (जिल्हा पुणे) – दौंड नगरपालिकेने भीमा नदीकाठी उभारलेले पशूवधगृह बंद झाले नाही, तर उग्र आंदोलन केले जाईल, अशी थेट चेतावणी सरला बेट (जि. नगर) येथील ‘सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान’चे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिकेने २ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी खर्च करून शहरातील खाटीक गल्लीमध्ये उभारलेले पशूवधगृह भुईसपाट करण्याच्या मागणीसाठी ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चा नंतर झालेल्या सभेस महंत रामगिरी महाराज यांनी संबोधित केले.

ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांच्यासह ह.भ.प. काका महाराज पाहणे आणि रमेश महाराज भोसले या वेळी मंचावर उपस्थित होते. या वेळी नायब तहसीलदार शरद भोंग यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

ह.भ.प. शिरीष महाराज मोरे म्हणाले, ‘‘शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला ते अभिनंदनीय आहे; परंतु गोमातेची जेथे कत्तल होणार आहे, अशी पशूवधगृहे रहित केली जात नाहीत. दौंडमधील पशूवधगृहाच्या इमारतीत व्यायामशाळा, रुग्णालय, सांस्कृतिक सभागृह चालू करावे. महिन्याभरात पशूवधगृह रहित झाल्याचा शासन निर्णय द्यावा, अन्यथा आम्ही तो भुईसपाट करू.’’

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ जून २०२४ या दिवशी वारकरी संप्रदायातील ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज आणि अन्य वारकरी प्रतिनिधी यांच्या मागणीनुसार चंद्रभागा नदी अपवित्र करणारे दौंड येथील पशूवधगृह रहित करण्याचे आदेश पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दिले होते. या आदेशाची कार्यवाही न झाल्याने पशूवधगृह रहित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

अत्याचार सहन करणाराही दोषी ठरतो; म्हणून अत्याचार सहन करू नका !

महंत रामगिरी महाराज

महंत रामगिरी महाराज म्हणाले, ‘‘गोवंशहत्या बंदी कायदा असतांना चालू असलेली गोहत्या बंद झाली पाहिजे. कत्तल चालू राहिली, तर देशी गोवंश उरणार नाही. मध्यंतरी महिलांवर अत्याचार करण्याची प्रेरणा देणार्‍यासंबंधी मी केलेल्या विधानास वादग्रस्त ठरवून मला लक्ष्य करण्यात आले. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली; परंतु मी साधू आहे आणि माझे जीवन धर्माला समर्पित आहे. अत्याचार करणारा दोषी तर आहेच; पण सहन करणाराही दोषी ठरतो; म्हणून अत्याचार सहन करू नका.’’

संपादकीय भूमिका :

संतांना अशी चेतावणी का द्यावी लागते ? मोर्चा का काढावा लागतो ? प्रशासन निष्क्रीय आहे का ?