Maldives President Muizzu : (म्‍हणे) ‘भारताच्‍या सुरक्षेला हानी पोचेल, असे काहीही करणार नाही !’ – मालदीवचे राष्‍ट्रपती मुइज्‍जू

भारताच्‍या दौर्‍यावर असणारे मालदीवचे राष्‍ट्रपती मुइज्‍जू यांचे विधान

मालदीवचे राष्‍ट्रपती मुइज्‍जू

नवी देहली – मालदीव भारताच्‍या सुरक्षेला हानी पोचेल, असे काहीही करणार नाही. भारत हा मालदीवचा महत्त्वाचा भागीदार आणि मित्र आहे. आमचे संबंध आदर आणि सामायिक हितसंबंध यांवर आधारित आहेत, असे विधान मालदीवचे राष्‍ट्रपती महंमद मुइज्‍जू यांनी केले. ते सध्‍या भारताच्‍या दौर्‍यावर आले आहेत.

१. पत्रकारांशी बोलतांना मुइज्‍जू म्‍हणाले की, आम्‍ही इतर देशांसमवेत अनेक क्षेत्रांमध्‍ये सहकार्य वाढवत आहोत; परंतु यामुळे भारताच्‍या सुरक्षेला धोका पोचणार नाही. मालदीव भारतासमवेतच्‍या दीर्घकालीन आणि महत्त्वाच्‍या संबंधांना प्राधान्‍य देत राहील.

२. मालदीवमधून भारतीय सैनिकांना परत पाठवण्‍याविषयी मुइज्‍जू म्‍हणाले, ‘‘मालदीवच्‍या जनतेनी ही मागणी होती. आम्‍ही त्‍याचे पालन केले आहे. भारत आणि येथील जनता हे नक्‍कीच समजून घेऊन समजेल; कारण भारतात लोकशाही आहे.’’


मुइज्‍जू का आले आहेत भारतात ?

मालदीवला भारताकडून आर्थिक साहाय्‍य हवे आहे आणि भारताने दिलेल्‍या जुन्‍या कर्जाची परतफेड करण्‍यासाठी तो आणखी वेळ मागणार आहे. ‘भारताने साहाय्‍य केले नाही, तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल’, हे मालदीवच्‍या लक्षात आले आहे. मुइज्‍जू यांच्‍या पंतप्रधान मोदी यांच्‍यासमवेतच्‍या बैठकीत या सूत्रांना प्राधान्‍य असेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

संपादकीय भूमिका

जे देश चीनच्‍या कह्यात जातात, ते चीनच्‍या हिताचा आणि भारताचा घात करण्‍यासाठीच पावले उचलतात, हाच इतिहास आहे. त्‍यामुळे मुइज्‍जू यांच्‍या वक्‍तव्‍यावर कोण विश्‍वास ठेवणार ?