तेजस्विता बना !

नवरात्रोत्सव विशेष

जय महिषविमर्दिनि शूलकरे जय लोकसमस्तकपापहरे ।
जय देवि पितामहविष्णुनते जय भास्करशक्रशिरोवनते ।।

– दुर्गास्तोत्र

अर्थ : हे महिषासुराचे मर्दन करणारी, शूल धारण करणारी, सर्व लोकांतील पापांचा नाश करणार्‍या हे भगवती, तुझा विजय असो. ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्याकडून नमस्कार केल्या गेलेल्या हे भगवती, तुझा विजय असो.

प्रसंगी यमदेव, पंचतत्त्व यांना आव्हान देणारी सत्त्वप्रधान सती सावित्रीचे स्मरण करून तिची तेजस्विता अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी नवरात्रीचा उत्सव आहे. आजची स्त्री तिचे सत्त्व हरवून बसली आहे. स्वत:मधील पातिव्रत्याच्या तेजाने देवांनाही बाळरूप घेण्यास भाग पाडणारी माता अनुसूया कुठे आणि आज अंगप्रदर्शन करून बालिशपणे मौज करणारी आजची युवती कुठे ? उच्च शिक्षणाने सक्षम होण्याऐवजी स्वातंत्र्याच्या नावाखाली ती तिचे मूळ शक्तीस्वरूप हरवत चालली आहे का ? मागील काही दशकांपर्यंत देशात साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी अंगी बाणवणार्‍या महिला होत्या. आजही डॉ. सुधा मूर्तींसारख्या काही उच्चपदावर राहूनही आदर्श जोपासणार्‍या धर्माचरणी महिला आहेत. आज आधुनिकतेच्या नावाखाली स्वतःचे मूळ स्वरूप विसरत चाललेल्या स्त्रीने दुर्गा उपासनेच्या निमित्ताने स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे.

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धरी’, असे म्हणतात; पण खरच आजचे मातृत्व या कसोटीवर उतरत आहे का ? राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवले, तसे प्रत्येक मातेने तिचा मुलगा राष्ट्र आणि धर्म यांसाठी कसा घडेल, हे पाहिले, तर आजची हिंदूंवरील आक्रमणे रोखण्याचे सामर्थ्य उद्याच्या पिढीत निर्माण होईल. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या कार्यात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढणार्‍या स्त्रिया होत्या. स्वातंत्र्यलढ्यापूर्वी अनेक स्त्रियांनी कुटुंबात राहूनही देव, देश आणि धर्म यांसाठी कंबर कसली होती. अनादी, अनंत, जगत्जननी असलेले देवीतत्त्व स्वत:मध्ये काही अंशाने तरी आणण्याची क्षमता आजच्या स्त्रियांमध्ये कितपत आहे ? येत्या काळात हिंदु राष्ट्राची पिढी निर्माण करणारी माता बनण्याचे दायित्व तिच्यावर आहे; केवळ पुरुषांच्या बरोबरीने मद्यप्राशन करून हे साध्य होणार नाही. ‘कलियुगात स्त्रीशक्तीच पालट घडवणार आहे’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. आदिशक्तीचे तत्त्व प्रत्येक ‘स्त्री’मध्ये येण्यासाठी तिला मनोभावे सतत शरण गेले पाहिजे ! धर्म आणि राष्ट्र यांच्यासाठी कार्यरत रहाणार्‍या स्त्रीवर देवीची कृपा नक्कीच होईल !

–  सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी