मुंबई – अनेक पुढार्यांनी मुंबईत शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या पोकळ घोषणा केल्या. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. पर्यावरणाच्या अडचणी निर्माण झाल्याने काम रखडल्याचे सांगण्यात आले. सरदार वल्लभभाईंचा गुजरातमध्ये पुतळा उभारला. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतांना अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ अद्याप रखडला आहे, असा प्रश्न स्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला. मुंबईतील ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे यासाठी आंदोलन करतांना ते बोलत होते.
ते या वेळी म्हणाले की, ज्याअर्थी वर्ष २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी अरबी समुद्रात शिवरायांच्या पुतळ्यासाठी जलपूजन केले त्याअर्थी सर्व अनुमती मिळालेल्या असणार. गडकोट व्यवस्थित राहिले पाहिजेत. असा माझा १५ ते २० वर्षांपासून प्रयत्न चालू आहे. रायगडावर रायगड प्राधिकरण करण्यास मी सरकारला भाग पाडले. ७५ वर्षांत पहिल्यांदा रायगडाचे संवर्धन चालू झाले.