|
सातारा, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील माची पेठ परिसरामध्ये लागून असलेल्या चिकनचे दुकान आणि सर्व्हिसिंग सेंटर यांच्या परिसरात झालेल्या भीषण स्फोटामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या स्फोटात मुजमील हमीद पालकर हे जागीच ठार झाले, तर नमाजपठण करण्यासाठी मशिदीकडे निघालेल्या हरून बागवान आणि उमर बागवान हे दोघेजण गंभीर घायाळ झाले आहेत. स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला ?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. (मागील वर्षीही सातारा येथे स्फोट झाला होता. त्याविषयी पुढील माहिती काही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या स्फोटांविषयी संशय वाढत आहे. अन्वेषण यंत्रणांनी सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! – संपादक)
१. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, परिसरातील काही घरांची हानी झाली आहे. समोरील एका इमारतीतील सदनिकेच्या काचा फुटल्या आहेत.
२. नवरात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी झालेल्या या स्फोटामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. शाहूपुरी आणि शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत बाँबशोधक पथक आणि ‘फॉरेन्सिक टीम’सुद्धा (न्यायवैद्यक पथक) आली होती.
३. पंचांसमक्ष घटनास्थळावरील वस्तूंची पडताळणी केली; मात्र स्फोट कोणत्या वस्तूचा झाला ? हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. बाँबशोधक पथक आणि शहर पोलीस स्फोट कोणत्या वस्तूमुळे झाला ?, याचा शोध घेत आहेत.