नवरात्रीमध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या भावसत्संगाविषयी मुंबई जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. सौ. ज्योती कांबळे, बोईसर

१ अ. साधकांना देवीतत्त्वाची आवश्यकता असल्यामुळे नवरात्रीचे भावसत्संग होत असून ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवीचे रूप असून प्रत्यक्ष देवीच घरी येणार आहे’, या भावाने तिच्या आगमनाची सिद्धता केली जाणे : ‘देवीलाच आम्हा साधकांची काळजी आहे. ‘आम्हा साधकांना देवीतत्त्वाची आवश्यकता आहे’, यासाठीच वर्ष २०२० मध्ये नवरात्रीचे विशेष भावसत्संग असणार आहेत’, असे मला वाटले. माझी भावसत्संगाविषयी उत्कंठा वाढू लागली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ स्वतः देवीचे रूप आहेत. मला प्रत्येक देवीत त्यांचे रूप दिसत होते. मला ‘साक्षात् देवीचे वास्तूत आगमन होणार आहे’, या विचाराने पुष्कळ आनंद होत होता. ‘आपण तिच्या आगमनाची सिद्धता करूया’, असे वाटून मी घराची शुद्धी केली.

१ आ. लक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजात सत्संग ऐकतांना पुष्कळ आनंद होऊन ‘चराचरांत देवीतत्त्व आहे’, असे जाणवणे : पहिल्या दिवशीचा भावसत्संग चालू झाला, तेव्हा लक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजाने माझे मन व्याकुळ झाले. मला त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. ‘देवीच देवीचा महिमा सांगत असून दैवी वाणीने अनुभवकथन होत आहे. भावसत्संगातील प्रत्येक शब्दाचा ‘बीजमंत्र’ सिद्ध होत आहे. ब्रह्मांडातील कणाकणांत देवीतत्त्व वास करत आहे’, याची मला जाणीव झाली. ‘ज्यांना हे भावसत्संग ऐकायला मिळाले, ते सर्व जीव भाग्यवान असून आम्हा सर्वांचे भाग्य उजळत आहे’, असे मला वाटले.

१ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतील सत्संगांमुळे आपत्काळही साधनेसाठी सुवर्णकाळ झाला आहे’, असे जाणवणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ प्रत्येक शब्द अतिशय प्रेमपूर्वक उच्चारत होत्या. ‘त्यांच्या प्रीतीमय भावपूर्ण शब्दांनी पूर्ण धरती चैतन्याने भारीत होत आहे’, असे मला वाटत होते. ‘आमच्यासाठी हा भावसत्संग देऊन देवाने आपत्काळही साधकांच्या साधनेसाठी ‘सुवर्णकाळ’ करून दिला आहे’, याची जाणीव झाली.

१ ई. ‘कठोर तपश्चर्येनेच साधना होते’, हे लक्षात येऊन साधनेची तळमळ वाढणे : देवादिकांनीही कठोर तपश्चर्या आणि साधना केली आहे. श्री पार्वतीदेवीनेही कठोर तप केले आहे. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनीही साधनारूपी कठोर तपस्या केली आहे’, याची जाणीव झाली. आपणही आपली साधना तळमळीने वाढवली पाहिजे. ‘प्रत्येक कृती तपश्चर्या म्हणून करणे किती अनिर्वाय आहे’, याची भावसत्संगात तीव्रतेने जाणीव झाली. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या कथेत त्यांची देवीच्या दर्शनासाठीची व्याकुळता ऐकून माझ्याकडूनही देवीकडे साधना वाढवण्यासाठी आर्ततेने प्रार्थना होत होत्या.

१ उ. कृतज्ञता : ‘भावसत्संगात आदिशक्तीचे चैतन्य जागृत झाले आहे’, या जाणिवेने भावाश्रू येत होते. या अज्ञानी जिवाला देवीने जवळ करून ज्ञान वाढीस लागण्यासाठी साधनामार्ग दाखवला. त्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’

२. सौ. सायली यादव, मुलुंड

२ अ. सत्संग चालू असतांना घरात सर्वत्र लाल प्रकाश दिसून ‘देवीतत्त्व माझ्या पेशीपेशींत भिनत आहे’, असे जाणवणे : ‘नवरात्रीत देवीचा भावसत्संग ऐकतांना मला ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ प्रत्यक्ष समोर बसून सत्संग घेत आहेत’, असे जाणवायचे. चौथ्या दिवशी सत्संग चालू असतांना संपूर्ण घरात लाल प्रकाश पडलेला दिसला. तो लाल प्रकाश खिडकीच्या बाहेरही जाणवला. पाचव्या दिवसापासून ‘देवीतत्त्व माझ्या पेशीपेशींत भिनत आहे’, असे मला जाणवत होते.

२ आ. ‘मी रामनाथी आश्रमातच आहे’, असे सांगून कुलदेवी श्री भवानीमातेने जणू साधिकेला गुरुचरणी सोपवून रामनाथी आश्रमातील भवानीदेवीत लुप्त होणे : प्रतिवर्षाप्रमाणे पंचमीच्या दिवशी मी कुलदेवता श्री भवानीदेवीसाठी तुळजापूरच्या पुजार्‍यांकडे अर्पण पाठवले होते. भावसत्संग ऐकतांना मला ‘समोर श्री भवानीदेवी प्रकट झाली’, असे वाटले. भवानीआई मला रामनाथीला घेऊन गेली आणि ‘मी इथेच आहे’, असे सांगून ती रामनाथी आश्रमातील भवानीदेवीच्या मूर्तीत लुप्त झाली. जणूकाही मला गुरुदेवांकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) सोपवून माझी कुलदेवी अंतर्धान पावली.

२ इ. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) जाधवकाकू देवीच्या रूपात दिसणे, नंतर ‘स्वतःच देवी आहे’, असे जाणवणे : सातव्या दिवशी मला सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) जाधवकाकू देवीच्या रूपात दिसल्या. ‘मी त्यांची लाल साडीने ओटी भरत आहे’, असे मला जाणवले. आठव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी ‘मीच देवी असून मी लाल रंगाची नऊवारी साडी परिधान करून वावरत आहे’, असे मला दिवसभर जाणवत होते. नवरात्रीत भरभरून देवीतत्त्व अनुभवण्यास दिल्याबद्दल गुरुदेव, सर्व सद्गुरु, संत आणि श्री दुर्गादेवी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

३. सौ. सुजाता शेट्ये, मुलुंड

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेने आपत्काळात महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या दैवी आवाजात ९ दिवस भावसत्संग ऐकून अपार आंतरिक आनंद अनुभवता येणे : प.पू. गुरुदेवांच्या कृपेने या वर्षी वेगळे ‘न भूतो न भविष्यति ।’ असे नवरात्र अनुभवले. नऊ दिवसांच्या भावसत्संगातील क्षणांनी देवीचे निर्गुण रूप आणि तत्त्व अनुभवता आले. साक्षात् महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजाने माझे मन भारावून गेले. शरिरातील रोम-रोम, पेशी-पेशी चैतन्यांनी भारीत होत होती. ‘हा सत्संग पृथ्वीतलावर नाही, तर दैवीलोकांत होत आहे. त्या दैवीलोकातच रहावे. त्यातून बाहेर पडू नये’, असे मला वाटत होते. केवळ आणि केवळ गुरुदेवांच्या अपार कृपेने आपत्काळात ही दैवी लीला अनुभवता आली. ‘ब्रह्मांडातील प्रत्येक जीव हे सर्व अनुभवत आहे’, या नुसत्या जाणिवेनेच भावजागृती होत होती. गुरुदेवांनी आम्हा साधक जिवांना या ९ दिवसांत श्री नवदुर्गादेवीच्या माध्यमातून कधी न अनुभवलेला आंतरिक चैतन्य आणि आनंद अनुभवण्यास दिला, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

४.  सौ. सुशीला होनमोरे, बोईसर

४ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सत्संग घेत असतांना ‘आकाशातून नाद ऐकू येत आहे’, असे वाटून भावजागृती होणे : ‘घटस्थापनेच्या दिवशी सकाळपासूनच माझा श्री दुर्गामातेप्रती भाव जागृत होत होता. ‘हा सत्संग श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ घेणार असून तो इथून पुढे ९ दिवस प्रतिदिन ऐकायला मिळणार आहे’, या विचाराने माझे मन सारखे देवीकडे ओढ घेत होते. दुपारी भावसत्संग चालू झाल्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलत असतांना मला ‘आकाशातून नाद ऐकू येत आहे’, असे वाटत होते. तेव्हा माझी भावजागृती झाली. दुर्गादेवीची स्तुती ऐकतांना ‘प.पू. गुरुमाऊलीमुळे मला हे ऐकायला मिळत आहे’, या विचाराने माझे मन भरून येत होते. माझे भावाश्रू थांबत नव्हते. ‘या भावसत्संगाची अनुभूती सतत घेत रहावी’, असे मला वाटत होते.

४ आ. स्वतःमध्ये पालट करण्याची तळमळ वाढणे : मला सेवेचा ध्यास लागला. ‘माझे सर्वस्व दुर्गादेवीच्या चरणी अर्पण करावे’, असे मला वाटू लागले. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू लक्षात आले. तेव्हा आता ‘स्वतःला पालटायला हवे’, असे वाटून त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न चालू झाले.’

५. सौ. जयश्री जायगुडे, कोपरखैरणे 

५ अ. ‘जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊ दे आणि साधना अखंड होऊ दे’, यांसाठी जोगवा संपेपर्यंत पदर पसरून जोगवा मागणे : ‘मला नवरात्रीच्या कालावधीत ‘भावसत्संग ऐकतांना मी जणूकाही देवळात आहे’, असे वाटायचे. ‘जोगवा दे आई, तुझ्या कृपेची सावली दे आई, शरण येऊन पदर पसरते आई ।’, असा जोगवा मी तिच्याकडे मागतांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दोघी प्रत्यक्ष उपस्थित आहेत’, असे मला जाणवले. प्रत्यक्षातही जोगवा मागतांना मी डोळे मिटून पदर पसरला होता. ‘जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊ दे आणि साधना अखंड होऊ दे’, यांसाठी मी जोगवा संपेपर्यंत पदर पसरून जोगवा (भिक्षा) मागितला. ‘हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र’ यांसाठी आमची भक्ती वाढू दे’, या आर्त तळमळीने माझ्या डोळयांतून भावाश्रू आले. माझे मन प्रसन्न होऊन एकाग्रता वाढली.’

(क्रमशः)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक