इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला
नवी देहली – इस्रायलने २८ सप्टेंबरला लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये केलेल्या हवाई आक्रमणात लेबनॉनची फुटीरतावादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाला होता. यामुळे एका मोठ्या आतंकवाद्याचा अंत झाल्याचे म्हटले जाते; परंतु अद्यापही येथे चकमकी चालूच आहेत. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील वाढत्या तणावाविषयी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली.
पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींविषयीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली. ‘आपल्या जगात आतंकवादाला स्थान नाही. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा नेहमीच पाठिंबा असेल’, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी दिले.