Sanatan Sanstha Felicitated : गुजरात येथील ‘कर्णावती समन्वय परिवार गुजरात’ या संस्थेकडून उत्तम धर्मप्रसार कार्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सनातन संस्थेचा सन्मान !

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर कद्रेकर यांनी स्वीकारला सन्मान !

डावीकडून पुरस्कार स्वीकारतांना सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर कद्रेकर, प.पू. श्री बालयोगी उमेशनाथजी महाराज आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल

कर्णावती (गुजरात) : ‘समन्वय परिवार गुजरात’ यांच्या वतीने ‘पूर्व शंकराचार्य श्री भारतमाता मंदिर, हरिद्वार’चे द्वितीय संस्थापक प.पू. ब्रह्मलीन पद्मश्री स्वामी श्री सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त १९ सप्टेंबर या दिवशी प.पू. वाल्मीकि संत संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात उत्तम धर्मप्रसार कार्यासाठी सनातन संस्थेचा सन्मान भाजपशासित गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सनातन संस्थेचे गुजरात येथील साधक श्री. चंद्रशेखर कद्रेकर यांचा शाल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.

या संमेलनात अध्यात्म, धर्म आणि राष्ट्र यांच्या आधारे देशसेवा करणार्‍या सेवाभावी संस्थांचा सन्मान करण्यात आला, तसेच राष्ट्र-धर्माच्या संदर्भात संत आणि अतिथी यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाचा आरंभ संत आणि मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून आणि श्‍लोक म्हणून झाला. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित भावाने कार्य करणार्‍या संस्थांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल म्हणाले, ‘‘साधु-संतांच्या सनातन विचारांनीच धर्मचेतना जागृत होईल आणि राष्ट्र निर्माणाचे कार्य होईल. संतांच्या आशीर्वादाने धर्मशक्ती निर्माण होऊन भारत विकसित देश होईल.’’

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक –

प.पू. बालयोगी महाराज यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, ‘‘आध्यात्मिक शक्तीमुळे देशाची उन्नती होईल आणि भारत विश्‍वगुरूपद प्राप्त करेल; म्हणून आपल्याला धर्मासह राष्ट्रसेवाही करायला हवी.’’ या प्रसंगी बालयोगीजी उमेश नाथजी महाराज (पीठाधीश्‍वर श्री क्षेत्र वाल्मीकि धाम,उज्जैन आणि राज्यसभा सभासद) प.पू. श्री निखिलेश्‍वरानंदजी महाराज (अध्यक्ष, श्री रामकृष्ण आश्रम, राजकोट), डॉ. जयंतीभाई भादेशिया (रा.स्व.संघ), श्री. आश्‍विनभाई जानी (गायत्री परिवार), आमदार श्रीमती दर्शनाबेन वाघेला, तसेच ‘वाल्मीकि समाज गुजरात’च्या १६१ संतांची वंदनीय उपस्थिती होती.