Baluchistan Punjabi laborers Killed : पाकच्या बलुचिस्तानमध्ये झोपलेल्या ७ पंजाबी मजुरांची हत्या !

मजुरांची हत्या

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ७ पंजाबी मजुरांची ते झोपलेलेल असतांना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना पंजगुर शहरातील खुदा-ए-अबादान भागात घडली. पाकिस्तानी अधिकार्‍यांनी हे आतंकवादी आक्रमण असल्याचे म्हटले आहे. या आक्रमणामागे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बी.एल्.ए.) असल्याचे सांगण्यात येत आहे. साजिद, शफीक, फैयाज, इफ्तिखार, सलमान, खालिद आणि वासिया अशी ठार झालेल्यांची नावे असून ते पंजगुन येथे उभारण्यात येणार्‍या इमारतीसाठी मजूर म्हणून काम करत होते.

(म्हणे) ‘आतंकवादाच्या विरोधात कठोर पावले उचलणार !’

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे. पंतप्रधान शरीफ यांनी बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सर्फराज बुगती यांच्याकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला असून आतंकवादाच्या विरोधात कठोर पावले उचलण्याचे आश्‍वासनही दिले आहे. (स्वतः जगभरात आतंकवाद पसरवणारा पाकिस्तान आतंकवादाच्या विरोधात कठोर पावले उचलणार ! – संपादक)

बलुचिस्तान पंजाबी मुसलमानांचे कब्रस्तान बनत आहे

बलुचिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाकच्या पंजाब प्रांतातील मुसलमानांवर आक्रमण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. ऑगस्टमध्ये बलुचिस्तानच्या मुसाखाइल जिल्ह्यात बस थांबवून प्रवाशांचे ओळखपत्र पडताळून ते पंजाब प्रांतातील असल्याने त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले.

पंजाबी मजुरांची हत्या

यावर्षी एप्रिलमध्ये बलुचिस्तानमधील नोश्की येथे ९ पंजाबी प्रवाशांना त्यांचे ओळखपत्र पाहून ठार करण्यात आले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केच जिल्ह्यात ६ पंजाबी मजुरांची हत्या करण्यात आली होती. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र आंदोलन करणार्‍या बी.एल्.ए.ने अलीकडेच बलुचिस्तान प्रांतातील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्या आणि चौक्या यांना लक्ष्य करून आक्रमण केले होते. या आक्रमणांमध्ये १०२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते.