चौकशी समितीच्या अहवालातील माहिती
मुंबई – राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या चौकशी समितीने तिचा अहवाल सादर केला आहे. या अहवालातून अनेक धक्कादायक कारणे समोर आली आहेत. या अहवालात ‘चुकीचे वेल्डिंगचे काम, कमकुवत फ्रेम आणि फ्रेमला चढलेला गंज’, तसेच पुतळा उभारल्यानंतर योग्य ती देखभाल करण्यात न आल्याने हा पुतळा कोसळल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुंबईतील ‘नेव्हल डॉकयार्ड’ने भारतीय नौदल दिनानिमित्त जयदीप आपटे यांना कार्यारंभ आदेश दिला होता. पुतळ्याचा बांधकाम सल्लागार म्हणून चेतन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. या बांधकामाची देखरेख भारतीय नौदलाने करणे अपेक्षित होते; मात्र उद्घाटनानंतर देखभालीचे दायित्व राज्य सरकारी यंत्रणांचे असल्याचे भारतीय नौदलाने स्पष्ट केले. कोणत्याही पुतळ्याची योग्यरित्या पायाभरणी करणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची अनुमती घ्यावी लागते. या प्रकरणात पाटील यांनी बांधकाम विभागाकडून रितसर अनुमती घेतल्याचे सूत्रांच्या माध्यमातून समजते. पुतळा उभारतांना अनेक त्रुटी झाल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले आहे.