रामद्रोह करणार्‍यांवर तत्परतेने कारवाई का नाही ?

‘सुदर्शन’ वाहिनीवरील ‘बिंदास बोल’ या चर्चासत्रात उपस्थित प्रश्न

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा ‘सुदर्शन’ वाहिनीवरील ‘बिंदास बोल’ या कार्यक्रमात वाहिनीचे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांसह हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर, अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष स्वामी भारतानंद सरस्वती आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला. या चर्चासत्राला उपस्थित वक्त्यांनी ‘या प्रकरणी रामद्रोहींवर तत्परतेने कारवाई व्हायला हवी’, अशी स्पष्ट भूमिका मांडली. २५ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात डॉ. सुरेश चव्हाणके आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची सूत्रे वाचली. आज या चर्चेचा अंतिम भाग येथे प्रसिद्ध करत आहोत.  (उत्तरार्ध)

पूर्वार्ध वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/837212.html

प्रभु श्रीरामाचा अवमान झाल्याने हिंदू शांत बसणार नाहीत ! – स्वामी भारतानंद सरस्वती, अध्यक्ष, अखिल भारतीय संत समिती

स्वामी भारतानंद सरस्वती

संभाजी ब्रिगेड संघटनेचे आता विभाजन झाले आहे. आता उरलेल्या लोकांना घेऊन शरद पवार हे काम करत आहेत. आता बळकट सरकार आहे. प्रभु श्रीरामाचा अवमान झाला आहे. त्यामुळे हिंदू शांत बसणार नाहीत. पवार कुठल्याही मंदिरात गेले, तरी हिंदू आता त्यांना मते देणार नाहीत; कारण यांच्या पक्षाला मते देणे, हे मोठे पाप आहे. सतर्क हिंदू त्यांच्या जाळ्यात येणार नाहीत. शाम मानव आणि त्यांच्यासारख्या लोकांना राज्य सरकारकडून संरक्षण अन् सरकारी भत्ता मिळत आहे. सरकारी पैशाचा वापर करून हे लोक आतून मात्र देश आणि धर्म द्रोही कारवाया करत आहेत. महाराष्ट्र सरकारने राष्ट्र आणि धर्म विरोधी कार्य कोण करत आहे ? याचे अन्वेषण करावे. नाहीतर सर्व संत एकत्रित येऊन महाराष्ट्रात रस्त्यावर उतरतील !

स्वामी भारतानंद सरस्वती यांनी मांडलेली अन्य सूत्रे 

१. आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहोत. महाराव यांनी अनेक वेळा संतांच्या विरोधात लिखाण केले आहे. ते शरद पवार यांच्या धोरणांचाच एक केवळ भाग आहेत. ‘संभाजी ब्रिगेड’ संघटना शरद पवार यांचीच देन आहे. शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. पवार यांनी गणपतीच्या दर्शनाला जाणे, हे ढोंग आहे. ते मतपेढीसाठी जात आहेत. ते धर्मविरोधी आहेत. साम्यवादी धोरणे राबवणार्‍या नास्तिकवाद्यांचे प्रमुख आहेत. शेकडो वर्षे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी त्यांच्या गावात जाते, तरीही ते कधी उपस्थित राहिले नाहीत, कधी भजन केले नाही. त्यामुळे हिंदु आता यांना फसणार नाहीत.

२. अन्य पंथियांविषयी बोलले असते, तर आतापर्यंत ‘सर तनसे जुदा’ (शिरच्छेदाचा) फतवा काढण्यात आला असता. हिंदु सहिष्णू आहेत; म्हणून हे चालू आहे; परंतु अाता हिंदू जागृत झाले आहेत. आता वारकरी, संत रस्त्यावर उतरून सरकारकडे ‘या राष्ट्र आणि धर्म द्रोहींवर कारवाई करा’, अशी मागणी करतील. प्रभु श्रीराम हे राष्ट्रपुरुष असल्याने हा राष्ट्रद्रोहही आहे.

३. हिंदूंच्या सणांच्या वेळी यांच्या मोहिमा चालतात. ईदच्या वेळी पुरोगाम्यांच्या कुठल्याही मोहिमा चालत नाहीत.

ज्ञानेश महाराव हे हिंदुविरोधी इकोसिस्टमचा (यंत्रणेचा) भाग ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी चित्रलेखाचे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे. ज्ञानेश महाराव, शाम मानव हे साम्यवादी इकोसिस्टमचा एक भाग आहेत. चित्रलेखातून निवृत्ती घेतल्यानंतर ५ वर्षे ते कुठे होते ? आणि आता अचानक समोर येऊन हे बोलत आहेत. निवडणुका आल्याने ते सक्रीय झाले आहेत.


श्रीराम आणि सीता हे साक्षात् आदी नारायण अन् जगत्जननी होते !


अहल्येचा उद्धार करणार्‍या श्रीरामाला सीतेचे पावित्र्य ठाऊक नसेल का ? ज्ञानेश महाराव जे सांगत आहेत, त्यात काहीतरी तथ्य आहे का ? राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी हे लक्षात घ्यायला हवे की, प्रभु श्रीराम हा साक्षात् नारायण आणि सीतामाता ही जगत्जननी होती. ज्या प्रभु श्रीरामाने केवळ चरणस्पर्शाने माता अहल्येचा उद्धार केला, त्याला माता सीतेच्या पवित्रतेविषयी ठाऊक नसेल का ? किती मूर्खपणाची गोष्ट करत आहेत ? रामायणातील ‘अरण्यकांडा’त याचा उल्लेख येतो, तिथे प्रश्नाला उत्तर देतांना स्वतः प्रभु श्रीराम म्हणतो, ‘‘मी सीतामातेला जाणतो आणि माझ्या मनात तीच पवित्रतेची भावना आहे; परंतु तिन्ही लोकांत असे काही लोक आहेत, ज्यांच्या मनात असा काही भ्रम राहिला असेल, त्यामुळे तिची शुद्धता पूर्ण विश्वाला दाखवू इच्छितो.’’ असे प्रभु श्रीराम त्रिकालदर्शी होता.

– श्री. रमेश शिंदे

१. महंत रामगिरी महाराज आणि ज्ञानेश महाराव यांना वेगळा न्याय का ?

महाराष्ट्रात महंत रामगिरी महाराजांवर महंमद पैगंबर यांच्याविषयी एक शब्द बोलल्याने तत्परतेने कायदेशीर कारवाई झाली, त्याच पद्धतीने कायदेशीर कारवाई महाराव यांच्यावर का होत नाही ? कोल्हापूरमधील हिंदुत्वनिष्ठ दिवसभर पोलीस ठाण्यात बसले होते आणि त्यांनी पोलिसांना हाच प्रश्न विचारला. येथे कारवाई करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे ? श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी देशातील सर्व मोठे लोक जातात, पंतप्रधान जातात, त्या प्रभु श्रीरामावर टीका होते, तेव्हा कारवाईला विलंब का होतो ?

२. लोकांना भ्रमित करण्याचे कारस्थान

मूळ संभाजी ब्रिगेडमध्ये फूट पडली आहे. या नावाच्या ३-४ संघटना चालू आहेत. त्यामुळे एका संघटनेचा कार्यक्रम झाला, तर बाकीचे त्याला नाकारतात. ही लोकांना भ्रमित करण्याची पद्धत आहे. शिवसेना, पू. संभाजीराव भिडे यांना आव्हान देण्यासाठी आणि राजकीय हेतूने शरद पवार यांनी ‘संभाजी ब्रिगेड’ नावाने बनवलेल्या या संघटनेने ‘ब्राह्मणविरोधाचे, त्यांच्या विरोधात चुकीचे लिखाण करणे’, एवढेच काम केले आहे. ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे नाव न घेणे’, ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला’, असे सांगणे अशा गोष्टी यांनी केल्या. ‘सेव्ह गाझा’चे  (गाझा वाचवा, असे लिहिलेले) ‘टी शर्ट’ घालून फिरणार्‍यांना त्यांनी सांगितले नाही की, गाझा आणि भारत यांचा संबंध नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी पहाता ही सर्व ‘साम्यवादी हिंदुविरोधी यंत्रणा’ (इकोसिस्टम) आहे.

३. जो प्रभु श्रीरामाचा नाही, तो आमचा नाही !

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असणारे शाहू महाराज त्या मंचावर उपस्थित होते, अन्य लोकप्रतिनिधीही तिथे उपस्थित होते, त्यापैकी कुणीही ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा निषेध केला नाही. ‘जो प्रभु श्रीरामाचा नाही, तो आमचा नाही’, हे आता हिंदु समाजाने सांगायला हवे. प्रभु श्रीरामाचा अवमान करूनही शरद पवार केवळ दिखावा करण्यासाठी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले; मात्र ‘हिंदु समाज आता याला फसणार नाही’, असे आता हिंदु समाजाने सांगायला हवे.

४. महाराव यांना कुणाचे साहाय्य ?

मागे ज्ञानेश महाराव यांनी हिंदुद्वेषी डॉ. झाकीर नाईक आणि एम्.एफ्. हुसेन यांच्या सूत्रांवरून हिंदु जनजागृती समितीविषयी एक लेख लिहिला होता. त्या लेखाविरोधात आम्ही न्यायालयात याचिका केली. ‘‘तुम्ही जिथे सांगाल तिथे येऊन रस्त्यावरही क्षमा मागायला मी सिद्ध आहे. तुम्ही माझ्यावर कारवाई करू नका’’, असे महाराव यांनी त्या वेळी आम्हाला सांगितले होते. ही घाबरट व्यक्ती आहे. त्यांच्यात धैर्य नाही. त्यामुळे प्रभु श्रीरामाविषयी अवमानकारक वक्तव्य करण्यासाठी महाराव यांना कुणीतरी साहाय्य केले आहे, हे स्पष्ट होते.

‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी चर्चासत्राच्या वेळी उपस्थित केलेले प्रश्न !

१. शरद पवार यांनी मंचावर प्रभु श्रीरामांविषयीचे अवमानजनक भाषण का थांबवले नाही ? कि त्यांची याला सहमती असल्याचा हा संकेत आहे ?

२. जेव्हा कुठल्याही मंचावर प्रभु श्रीरामांचा अवमान होतो आणि शरद पवार मौन धारण करतात, तेव्हा ते त्यांची हिंदु धर्माविषयीची उदासीनता दर्शवत नाही का ?

३. प्रभु श्रीरामांचा अवमान करणार्‍या ज्ञानेश्वर महाराव यांच्यावर आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने कारवाई का केली नाही ? कि हिंदु धर्माचा अवमान करणे, हा महाराष्ट्रात अवमान राहिलेला नाही ?

४. शरद पवार यांच्या पक्षात कुणी अशी व्यक्ती नाही की, जी त्यांना प्रभु श्रीरामाच्या अवमानाविषयी स्पष्टीकरण देण्यास सांगेल ? त्यांची पत्नी, मुलगी, नातवंडे यांपैकी कुणी त्यांना समजावत का नाहीत ?

५. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने गप्प बसणे, हे त्यांच्या वैचारिक आणि राजनैतिक अजेंड्याचा (कार्यसूचीचा) भाग आहे का ? कि हा हिंदूंच्या अपमानाचा समर्थन करण्याचा संकेत आहे ?

६. शरद पवार त्यांच्या गप्प बसण्यातून ते हे सिद्ध करू पहातात की, त्यांचे प्राधान्य मतपेढी आहे न की हिंदु धर्म किंवा त्याचे हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले प्रभु श्रीराम यांचा सन्मान !

७. जर शरद पवार खरोखरच श्रीरामाचा सन्मान करतात, तर त्यांनी त्या वक्त्याला मंचावरून हटवून सार्वजनिकपणे फटकारले का नाही ?

८. देशभरातील हिंदु समाज शरद पवार यांच्यासारख्या ‘रामद्रोही के यार’ असलेल्यांना एक सशक्त संदेश देण्यासाठी हिंदु समाज व्यापक आंदोलन करील की, त्याचा आवाज प्रत्येक घरापर्यंत पोचेल आणि दुसरा शरद पवार निर्माण होणार नाही.

९. पवार यांचे गप्प बसणे, म्हणजे हिंदुविरोधी शक्तींना सहकार्य करण्याचे प्रमाण आहे ? काय ते जाणूनबुजून हिंदूंच्या भावनांचा अवमान करत आहेत ? ज्यामुळे मुसलमान मतपेढी मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळ येईल.

१०. महाराष्ट्रातील साधू, संत आणि वारकरी समाज या अवमानानंतर शरद पवार यांना क्षमा करील का ? ते जनतेला त्यांच्या हिंदुविरोधी कृतीविषयी स्पष्टीकरण कधी देणार ?

संपादकीय भूमिका

जो प्रभु श्रीरामाचा नाही, तो आमचा नाही, हे आता हिंदु समाजाने सांगायला हवे !