रामद्रोह करणार्‍यांवर तत्परतेने कारवाई का नाही ?

‘सुदर्शन’ वाहिनीवरील ‘बिंदास बोल’ या चर्चासत्रात उपस्थित प्रश्न

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा ‘सुदर्शन’ वाहिनीवरील ‘बिंदास बोल’ या कार्यक्रमात वाहिनीचे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांसह हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर, अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष स्वामी भारतानंद सरस्वती आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला. या चर्चासत्राला उपस्थित वक्त्यांनी ‘या प्रकरणी रामद्रोहींवर तत्परतेने कारवाई व्हायला हवी’, अशी स्पष्ट भूमिका मांडली. या चर्चेचा पहिला भाग येथे प्रसिद्ध करत आहोत.  (पूर्वार्ध)

‘बिंदास बोल’ या कार्यक्रमाचे केलेले विज्ञापन

शरद पवारांची पत्नी किंवा मुलगी यांच्याविषयी कुणी काही बोलले असते, तर मीही मंचावरून त्यांना थांबवले असते ! – डॉ. सुरेश चव्हाणके

१. ज्ञानेश महाराव यांनी केलेली टीका ही कायदा, नैतिकता, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक, अशा सर्व दृष्टीकोनातून हा अपराध आहे. शरद पवार यांच्या जागी मी असतो, तर माता सीता किंवा माता उर्मिला यांच्याविषयी सोडाच, त्यांची पत्नी वा मुलगी यांच्याविषयी जरी बोलले गेले असते, तरी मी बोलणार्‍याला थांबवले असते आणि मंचावरून खाली उतरवले असते. येथे तर प्रभु रामचंद्रांची गोष्ट आहे.

२. ‘शरद पवार तुम्ही रामद्रोही आहात’, हेच या घटनेवरून सिद्ध होते. तुम्ही मौन बाळगले. तुम्ही हात दाखवून तरी टीका थांबवू शकला असता. महाराष्ट्राच्या निवडणुकीत लोकसभेचा मतदार टिकून रहावा, या छोट्या स्वार्थासाठी हे पाप केले.

३. ‘महाराव यांच्या वक्तव्याला रामभक्त विरोध करतील आणि मग रामद्रोही महाराव यांना पाठिंबा देतील’, अशा प्रकारे बाजारातील स्वतःचे मूल्य वाढवण्याची ही पद्धत आहे.

४. देशभरातील रामभक्तांनी अशा प्रकारे निषेध करावा की, त्याविषयीचा संदेश देशभरात जाईल.

संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम नव्हता ! – एक पदाधिकारी, संभाजी ब्रिगेड

प्रवीण गायकवाड आणि त्यांचे साथीदार, जे दगाबाज लोक आहेत, त्यांनी हा कार्यक्रम केला होता. श्रीराम आदर्श पती, पुत्र, राजा होते. त्यांनी कार्यक्रम केला, ही संभाजी ब्रिगेडची अधिकृत भूमिका नाही. आम्ही ३ पाने प्रभु श्रीरामाविषयी लिहिली आहेत. आम्ही महाराव यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. आम्ही त्याची निंदा करतो.

ज्ञानेश महाराव हे हिंदुविरोधी ‘टूलकीट’चाच (विरोधी यंत्रणेचा) एक भाग ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर

ज्ञानेश महाराव हे एकदा माझ्यासमवेत टीव्हीवरील चर्चासत्रासाठी आले होते. कुणीतरी सांगितले की, साम्यवाद्यांना धमक्या येत आहेत. तेव्हा महाराव हे ‘त्यांनाही धमक्या येतात’, हे सांगतांना पुष्कळ घाबरले होते. त्यांना त्यांचे स्वतःचे धैर्य किंवा शौर्य नाही. ते काही लोकमान्य टिळक किंवा बाळशास्त्री जांभेकर यांच्यासारखे स्वतंत्र संपादक नाहीत. ते एक नोकर होते. केवळ शरद पवार यांच्यामुळे ते हे धैर्य दाखवू शकले आहेत. ज्ञानेश महाराव हे शरद पवार यांच्यासारख्यांच्या ‘टूलकीट’चाच (विरोधी यंत्रणेचा) एक भाग आहेत ! त्यांचे स्वरूप उघडे पडले आहे.

‘धर्मावर आघात करणार्‍यांना मते देऊ नका !

शरद पवार मतांची भीक मागण्यासाठी लालबागच्या राजाला गेले. लोकांना हे कळले पाहिजे की, हे ढोंग आहे. निवडणूक आयोगाचे नियम आहेत, ‘धर्माच्या नावावर तुम्ही मते मागू शकत नाहीत’; मात्र ‘कुणी व्यक्ती जर हिंदु धर्मावर आघात करत असेल, तर ‘लोकहो त्याला मत देऊ नका’, हे सांगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे.

पू. संभाजी भिडेगुरुजींसारख्यांची ‘लायकी’ काढणारे पवार महारावांसारख्या व्यक्तींची लायकी मात्र मानतात !

नुकतेच शरद पवार यांना पू. संभाजी भिडेगुरुजींविषयी त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘संभाजी भिडे कोण आहेत ? त्यांची ‘औकात’ (लायकी) नाही.’’ हेच शरद पवार मात्र ज्ञानेश महाराव यांची लायकी मानतात आणि असे करून शरद पवार त्यांची लायकी लोकांना दाखवत आहेत. यांची काय लायकी आहे की, पू. संभाजी भिडेगुरुजींविषयी हे वाक्य बोलले जाते आणि ज्ञानेश महाराव यांच्याविषयी गप्प राहिले जाते. संपूर्ण महाराष्ट्राला शरद पवार हे काय आहेत, हे कळून चुकले आहे.

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी मांडलेली अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे

१. जेव्हा महाराव बोलत होते, तेव्हा त्यांना न थांबवून किंवा मंचावरून न हटवून शरद पवार त्याचे मूकसंमतीदार बनले. महाराष्ट्रातील हे स्वतःला विद्रोही आणि क्रांतीकारी म्हणवणारे सनातन धर्मावर आघात करत रहातात. शरद पवार यांच्या अहंकाराच्या पुष्ट््यर्थ या गोष्टी बोलल्या गेल्या.

२. अभिनेत्री केतकी चितळे यांनी ‘पवार’ या शब्दाचा उल्लेख असलेली कविता लिहिली, तर तिच्यावर ३० प्रथमदर्शी अहवाल प्रविष्ट झाले. महाराव यांनी केलेल्या टीकेमुळे संपूर्ण महाराष्ट्र, वारकरी, समर्थभक्त व्यथित आहेत (पण तक्रारी प्रविष्ट होत नाहीत). महाराव यांनी कधी (महाराष्ट्राच्या जनतेचे रक्त पिणारे) साखरसम्राट, सहकारसम्राट, शिक्षणसम्राट यांच्याविषयी कधी काही म्हटलेले नाही; परंतु ते प्रभु श्रीरामाविषयी बोलत आहेत.

३. शरद पवारांनीच म्हटले पाहिजे, ‘ही व्यक्ती कारागृहात गेली पाहिजे, मी साक्ष देईन.’

४. जनता तर आंदोलन करीलच; पण महाराष्ट्र सरकारने विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करून आणि साक्षी-पुरावे देऊन जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)