तिरुपती बालाजी मंदिराचे व्यवस्थापन हिंदूंकडे सोपवावे !  

उडुपीतील पेजावर मठाचे विश्‍व प्रसन्न स्वामीजी यांची मागणी

पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्न स्वामीजी

उडुपी (कर्नाटक) – तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात माशांचे तेल, डुक्कराची चरबी आणि गोमांसापासून बनवलेली चरबी वापरणे, हा हिंदु समाजाचा मोठा अपमान आहे. हा देवाचा केलेला अपमानदेखील आहे. सरकारनेच असे नीच कृत्य केले आहे, हे निंदनीय आहे. धार्मिक केंद्रे सरकारच्या नियंत्रणात नसावीत, ती सर्व हिंदु धर्मियांच्या नियंत्रणात असावीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही हेच सांगितले आहे. आता तरी मंदिरांची सरकारच्या नियंत्रणातून मुक्तता करावी. तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन हिंदूंकडे सोपवावे, अशी मागणी उडुपीतील पेजावर मठाचे विश्‍व प्रसन्न स्वामीजी यांनी केली आहे.

स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘तिरुपतीच्या श्रीनिवासाने गायीच्या रक्षणासाठी अवतार घेतला होता’, असे पुराण सांगते. या पुण्यक्षेत्रात गाय सापाला दूध पाजत होती. त्या वेळी श्रीनिवासानेच मालकाच्या तावडीतून गायीला वाचवले होते, असे सांगितले जाते. अशा श्रीनिवासालाच गायीच्या चरबीचा प्रसाद देण्यात आला. हा एक अक्षम्य अपराध आहे. हे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर झालेले आक्रमण आहे.’’