मूळ प्रश्न
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हल्लीचे बहुतेक संत पूर्वीच्या संतांप्रमाणे आध्यात्मिक स्तरावर लिखाण न करता मानसिक स्तरावर करतात. याचे कारण काय ?
१. काळानुसार संतांचे विविध अवस्थांत रहाण्याचे प्रमाण
२. संत ‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायाप्रमाणे वागत असल्याने आणि समष्टीची सात्त्विकता न्यून झाल्याने संतांना दीर्घकाळ सगुणात रहावे लागणे
जीव आणि जीवात्मा या स्थितीला मन अन् बुद्धी कार्यरत असतात. याउलट शिवात्मा अवस्थेपासून मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील खर्या आध्यात्मिक स्थितीला आरंभ होतो.
संतांचा मनोलय झालेला असल्याने ते ‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायाप्रमाणे, म्हणजे साधक आणि भक्त यांच्या मनातील इच्छेप्रमाणे प्रतिसाद देतात. काळानुसार समष्टीची सात्त्विकता न्यून झाली आहे. त्यामुळे संतांकडे असणारे साधक आणि भक्त हेही आध्यात्मिक स्तरावर नसून मानसिक अन् बौद्धिक स्तरावर असतात. असे साधक आणि भक्त यांच्या मानसिक अन् बौद्धिक अडचणी आणि शंका यांचे समाधान करण्यासाठी किंवा त्यांच्याकडून साधना करून घेण्यासाठी, तसेच त्यांच्या चुका सांगण्यासाठी संतांनाही दीर्घकाळ सगुणात, म्हणजे जीवात्मा किंवा जीव स्थितीत रहावे लागते.
३. वर्तमान कलियुगातील व्यष्टी गुरूंचे कार्य ‘जिवाला पुढच्या टप्प्याकडे नेणे’, हे असल्याने त्यांनी मानसिक स्तरावरील लिखाण करणे
पूर्वीच्या युगात मोक्षप्राप्ती किंवा ईश्वरप्राप्ती यांसाठी गुरूंकडे येणार्या साधकांचे प्रमाण अधिक होते. कलियुगात मायेचा प्रभाव वाढल्यामुळे व्यष्टी साधना शिकवणार्या संतांचे ‘मोक्षगुरु’ या रूपातील कार्याचे (मोक्ष मिळण्यासाठी परिपूर्ण साधना शिकवण्याचे) प्रमाण न्यून होऊन ‘दीक्षागुरु’ (साधनेला आरंभ करून देणारे गुरु), ‘मंत्रगुरु’ (साधनेतील विशिष्ट अडथळे दूर करण्यासाठी साधना सांगणारे गुरु) या रूपांतील, म्हणजे साधकाला एका टप्प्यातून पुढच्या टप्प्याकडे नेण्याच्या कार्याचे प्रमाण वाढले आहे.
वर्तमान कलियुगात समाजातील अधिकांश संतांकडे येणारे अधिकतर साधक आणि भाविक यांना साधना अन् अध्यात्म यांचा गंध नसतो, याउलट त्यांच्या मानसिक अडचणी अधिक असतात. त्यामुळे अशा समष्टीला साधनेच्या पुढच्या टप्प्याला नेण्यासाठी संत त्यांना समजेल, अशा भाषेत ज्ञान देण्यासाठी जीवात्मा किंवा जीव अवस्थेत येतात. या अवस्थेत त्यांना मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील अध्यात्म अनुभवता येत नसल्याने त्यांचे लिखाण मानसिक स्तरावरील असते.
४. संतांनी त्यांच्या आध्यात्मिक स्तरानुसार समष्टीला मार्गदर्शन करणे आणि त्याचे समष्टीला होणारे लाभ
समाजातील संतांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्याकडे उपासक, भाविक, साधक, भक्त किंवा शिष्य आकृष्ट होतात. वर्तमान कलियुगातील ८० टक्के संत दीक्षागुरु, मंत्रगुरु किंवा साधनागुरु या टप्प्यापर्यंतच मर्यादित असतात. त्यामुळे संतांचीही आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होत नाही आणि त्यांच्याकडे येणारे उपासक अन् भाविक यांनाही आध्यात्मिक प्रगतीच्या तुलनेत साधना म्हणून केल्या जाणार्या त्याच त्याच सात्त्विक कृतींमुळे मिळणारा तात्कालिक आनंद हवा असतो. असे असले, तरी संतांनी केलेल्या मानसिक लिखाणाचे समाजाला पुढील लाभ होतात.
४ अ. समष्टीला होणारे लाभ
१. प्राथमिक स्तरावरील साधकाच्या मानसिक आणि बौद्धिक अडचणी दूर झाल्याने त्याची थोडीफार उन्नती होऊन तो साधक किंवा शिष्य या टप्प्यापर्यंत जातो. शिष्याची पातळी गाठल्यावर त्याच्या जीवनात ‘मोक्षगुरु’ येतात.
२. वर्तमान कलियुगातील ८५ टक्के समष्टीच्या मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील अध्यात्माविषयीच्या जिज्ञासेचे शमन होते. खरे अध्यात्म शिकवणार्या संतांना त्यासाठी वेळ द्यावा लागत नाही.
३. पाताळातील अनिष्ट शक्तींनी अध्यात्म आणि साधना यांच्या संदर्भात पसरवलेल्या मानसिक स्तरावरील अनेक अनुचित धारणांचे खंडण होते.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(ज्ञान मिळण्याचा दिनांक आणि वेळ : २७.२.२०२४, सकाळी: ९.२५; ज्ञानाच्या टंकलेखनाचा दिनांक आणि वेळ : ८.३.२०२४, सकाळी: ९.३० ते १०.०१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. |