WB CM Ready to Resign : (म्‍हणे) ‘लोकहितासाठी मी त्‍यागपत्र देण्‍यासही सिद्ध !’ – ममता बॅनर्जी

कोलकाता येथील बलात्‍कार आणि हत्‍या यांचे प्रकरण

मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता – येथील आर्.जी. कर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्‍कार-हत्‍येप्रकरणी सध्‍या देशभरात संतप्‍त भावना व्‍यक्‍त होत आहेत. या प्रकरणामुळे बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारसमोरही पेच निर्माण झाला आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरवर शासकीय रुग्‍णालयात बलात्‍कार-हत्‍या होण्‍यासारखा प्रसंग घडणे संतापजनक असल्‍याचे म्‍हणत कनिष्‍ठ डॉक्‍टरांनी कामबंद आंदोलन चालू केले आहे. या आंदोलकांशी चर्चेचा मुख्‍यमंत्र्यांचा प्रयत्न निष्‍फळ ठरला आहे. या पार्श्‍वभूमीवर बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची क्षमा मागितली आहे. तसेच लोकहितासाठी त्‍यागपत्र देण्‍यासही सिद्ध असल्‍याचे ममता बॅनजी यांनी म्‍हटले आहे.

ममता बॅनर्जी परिस्‍थिती हाताळण्‍यात अपयशी ! – राज्‍यपाल

बंगालचे राज्‍यपाल आनंद बोस यांनी बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी राज्‍यातील परिस्‍थिती हाताळण्‍यात अपयशी ठरल्‍याचे सांगत त्‍यांच्‍यावर टीका केली. राज्‍यपाल म्‍हणाले, ‘त्‍यांना लोकांच्‍या भावना समजून घेण्‍यात अपयश आले आहे. राज्‍यात सर्वत्र हिंसाचार पसरला आहे. शांत बहुसंख्‍य हे लोकशाहीचा भाग असतात; पण बहुसंख्‍यांविषयी मौन हे लोकशाहीत अभिप्रेत नाही. बंगालच्‍या लोकांप्रतीच्‍या सहवेदना म्‍हणून मी मुख्‍यमंत्र्यांवर सामाजिक बहिष्‍कार घालतो.’

संपादकीय भूमिका

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्‍टरची हत्‍या करून बलात्‍कार झाल्‍यानंतर मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्‍या पद्धतीने हे प्रकरण हाताळले, यावरून त्‍यांची संवेदनशून्‍यता आणि जनताद्रोह दिसून येत आहे. त्‍यामुळे डॉक्‍टरांचे आंदोलन हाताबाहेर गेल्‍यानंतर ममता बॅनर्जी प्रकरण निवळण्‍यासाठी त्‍यागपत्राची भूमिका घेत आहेत, हे भारतीय नागरिक जाणून आहेत !