प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : नास्तिकः कश्च उच्यते ? को मूर्ख ?
अर्थ: नास्तिक कुणाला म्हणावे ? मूर्ख कोण ?
उत्तर : नास्तिको मूर्ख उच्यते ।
अर्थ : जो नास्तिक तोच मूर्ख होय.
यक्षाने दोन वेगळे प्रश्न विचारले आहेत. युधिष्ठिर त्या दोन प्रश्नांचे मिळून एकच उत्तर देत आहे. आधुनिक सुधारकांच्या दृष्टीने हा प्रश्न भयंकर आहे, युधिष्ठिर जे त्याचे उत्तर देतो त्यामुळे ते चिडून अंगावर धावून आल्याविना रहाणार नाहीत, अशा स्वरूपाचे आहे. उत्तर देतांना युधिष्ठिर म्हणतो, ‘‘नास्तिक हा मूर्ख असतो किंवा मुर्खालाच नास्तिक म्हणावे. आपापल्या सोयीने उलट सुलट काहीही समजून घ्यावे.’’
१. स्वतःची बुद्धीमत्ता सिद्ध करणारे कोणतेही लक्षण नसतांना ‘नास्तिक’ म्हणून मिरवतात !
अलीकडे असे दिसून येते की, जे चांगले, सुशिक्षित, विद्वान, बुद्धीमान आहेत, त्यातील काही स्वतःला भूषणाने ‘नास्तिक’ म्हणवून घेतात. ‘आम्ही केवळ इहवादी आहोत. परलोक, पुनर्जन्म, ईश्वर यांतील आम्ही काही मानत नाही. आम्ही कोणतेही कर्मकांड करत नाही’, असे अभिमानाने सांगितले जाते. काही बुद्धीमान मंडळी स्वतःला, असे नास्तिक म्हणवतांना पाहून बुद्धीमत्ता सिद्ध करणारे कोणतेही लक्षण ज्याच्याजवळ नाही, तोही मग स्वतःला नास्तिक म्हणून मिरवतो. त्यामुळे तरी लोक आपल्याला बुद्धीमान समजतील, असे त्याला वाटत असते. एखादा बुद्धीमान नास्तिक असेल; पण नास्तिकाला बुद्धीमान समजण्याचे यत्किंचितही कारण नाही.
२. शत-प्रतिशत नास्तिक असणे हे अशक्य !
एखादा बुद्धीमान स्वतःला ‘मी नास्तिक आहे’, असे म्हणवतो; पण ते तरी पूर्णपणे खरे आहे का ? एकवेळ शत-प्रतिशत आस्तिक असणे माणसासंबंधी संभवते. श्रीज्ञानेश्वरादी संत-महात्मे त्या कोटीतील असतात; पण शत-प्रतिशत नास्तिक असणे, हे माणूस असणार्याला अशक्य आहे. त्याच्या अंतःकरणात कुणाविषयी तरी आदर असतो. कशावर तरी त्याची श्रद्धा असते. कोणता तरी दिवस तो उत्सव म्हणून साजरा करतो. तो हिंदु धर्म मानणार नाही; पण साम्यवाद-समाजवादावर त्याची श्रद्धा असेल. तो ते तोंडाने बोलूनही दाखवतो. त्याला शंकराचार्य आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांविषयी आदर नसेल; पण त्याच्या बैठकीत मार्क्स, एंजल्स, लेनिन किंवा त्याच्या पक्षाचा पुढारी यांची चित्रे आदराने लावलेली असतील. बापाचे श्राद्ध करणार नाहीत; पण कुणाच्या शताब्द्या, संस्थांचे वर्धापनदिन, ‘मे’ दिन साजरा करणार किंवा त्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेणार. नास्तिकतेत हे सर्व कसे बसते, ते बुद्धीवादीच जाणोत. त्यांच्या वर्तनातील ही विसंगती त्यांना जाणवत नसेल, असे नाही; पण ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणा दाखवणार नाहीत.
३. मूर्खपणाला औषध नाही !
‘नास्तिकता स्वीकारायची, तर कार्यकारणभाव नाकारावा लागतो आणि व्यवहारात कार्यकारणभाव नाकारणे शक्य नाही, तसे आग्रहाने मानणे’, हे मूर्खपणाचेच आहे. तर्कदुष्टपणाचे आहे. कित्येकदा एका कार्याच्या मागे अनेक कारणे या कारणांची परंपरा असते. त्यातील कुणाला तरी प्रधान मानून निर्णय घ्यावे लागतात, तरच व्यवहार योग्य रितीने पार पाडता येतो. कार्यकारणभाव मानणे अपरिहार्य असल्याने ईश्वर नाकारणे चुकीचे ठरते; पण हे पटवून घेण्याच्या मनःस्थितीत नास्तिक मंडळी नाहीत. सर्वाला औषध असते. वेडेपणासुद्धा उपचाराने बरा करता येतो; पण ‘मूर्खस्य नास्त्यौषधम् ।’, म्हणजे ‘मूर्खपणाला औषध नाही.’ म्हणून युधिष्ठिर म्हणतो, ‘नास्तिको मूर्ख उच्यते ।’ (जो नास्तिक तोच मूर्ख होय.)
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ‘यक्षप्रश्न’ या ग्रंथातून)