सातारा येथील अस्वच्छ ऐतिहासिक मोती तळे !

सातारा, ११ सप्टेंबर (वार्ता.) – येथील ऐतिहासिक मोती तलावाचा परिसर गर्द पानवेलींनी झाकून गेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे मोती तळे डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांना निमंत्रण देत आहे.

शहरातील शुक्रवार पेठेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे हा परिसर राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. या निवासस्थानाच्या आरंभीच ऐतिहासिक मोती तळे आहे. तलावासमोरच प्रतापसिंह भाजी मंडईकडून येणारा मोठा ओढा आहे. या मोती तळ्याला सध्या पानवेलींनी मोठ्या प्रमाणात वेढा घातला आहे. सातारा नगरपालिकेच्या वृक्ष विभागाने पानवेली काढून परिसर स्वच्छ केलेला नाही. वृक्ष विभागाचे ठेकेदार पानवेली काढून परिसर स्वच्छ करण्यासाठी टाळाटाळ करतांना दिसतात.

केवळ निविदा स्वीकारून कामाकडे दुर्लक्ष करत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करणे, हे आरोग्य आणि वृक्ष विभागाचे काम आहे का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी ठेकेदारांना कडक शब्दात सूचना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संपादकीय भूमिका

स्वच्छतेविषयी आणि जनतेच्या आरोग्याविषयी असंवेदनशील असणारे सातारा प्रशासन ! ऐतिहासिक तळे अस्वच्छ असेल, तर शहरात अन्य ठिकाणी स्वच्छता कशी असेल ? याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन मोती तळे आणि शहरातील अन्य ठिकाणची स्वच्छता लवकरात लवकर करावी, ही अपेक्षा !