RBI Imposes Penalties On Banks : एच्.डी.एफ्.सी. आणि अ‍ॅक्‍सिस या बँकांना २ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड !

नियमांचे उल्लंघन केल्‍याने आर्.बी.आय.ची कारवाई

मुंबई – नियमांचे उल्लंघन केल्‍याच्‍या प्रकरणी भारतीय रिझर्व्‍ह बँकेने (आर्.बी.आय.ने) एच्.डी.एफ्.सी. आणि अ‍ॅक्‍सिस या बँकांना २ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावला. एच्.डी.एफ्.सी. आणि अ‍ॅक्‍सिस या दोन्‍ही बँका खासगी क्षेत्रातील मोठ्या बँका आहेत. या दंडाचा या बँकांच्‍या सर्वसामान्‍य ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.RBI Imposes Penalties On Banks :

‘बँकिंग नियमन कायद्या’तील तरतुदींचे उल्लंघन !

आर्.बी.आय.ने १० सप्‍टेंबरला प्रसिद्धीस दिलेल्‍या निवेदनात असे म्‍हटले आहे की, या दोन्‍ही बँकांकडून ‘बँकिंग नियमन कायद्या’तील तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. ठेवींवरील व्‍याजदर, बँकांचे कर्जवसुली पथक (रिकव्‍हरी एजंट) आणि बँकांमधील ग्राहक सेवा यांच्‍याशी संबंधित काही निर्देशांचे पालन न केल्‍यासाठी एच्.डी.एफ्.सी. बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला आहे. यासह आर्.बी.आय.ने अन्‍य एका निवेदनात म्‍हटले आहे की, ठेवीवरील व्‍याज दर, केवायसी, आणि कृषी कर्ज प्रवाह यांच्‍याशी संबंधित काही सूचनांचे पालन न केल्‍याने अ‍ॅक्‍सिस बँकेला १ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला आहे.

यापूर्वी ३ बँकांना ठोठावला आहे दंड !

आर्.बी.आय.ने १० दिवसांपूर्वी युको बँकेला २ कोटी ६८ लाख रुपये, पंजाब नॅशनल बँकेला १ कोटी ३२ लाख रुपये, तर ‘सेंट बँक होम फायनान्‍स लिमिटेड’ला २ लाख १० सहस्र रुपये, इतका दंड ठोठावला आहे.