ज्येष्ठा गौरी

१० सप्टेंबर २०२४ (आज) या दिवशी ‘गौरी आवाहन’ आहे. त्या निमित्ताने…

१. तिथी : ‘भाद्रपद शुक्ल सप्तमी

२. इतिहास आणि उद्देश : असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्री महालक्ष्मी गौरीला शरण गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य राखण्यासाठी तिची प्रार्थना केली. श्री महालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुक्ल सप्तमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांचे पती आणि पृथ्वीवरील प्राणी यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.

३. व्रत करण्याची पद्धत :

अ. हे व्रत ३ दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री लक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे ५ लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ५ लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात अन् त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात.

आ. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात.

इ. तिसर्‍या दिवशी गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’)