Pakistan Mall Loot : कराची (पाकिस्तान) येथे मॉलच्या उद्घाटनातनंतर अवघ्या अर्धा घंट्यात लोकांनी ते लुटले !

(मॉल म्हणजे मोठे व्यापारी संकुल)

कराची (पाकिस्तान) – येथे नव्याने उघडलेल्या ‘ड्रीम बाजार’ नावाचा मॉल पहिल्याच दिवशी स्थानिक लोकांनी अवघ्या अर्ध्या घंट्यात लुटला. विशेष म्हणजे या मॉलमधील प्रत्येक वस्तूची किंमत ५० रुपयांपेक्षा अल्प ठेवण्यात आली होती. या घटनेनंतर हा मॉल अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आला आहे.

‘ड्रीम बाजार’चा सामाजिक माध्यमांतून मोठा प्रसार करण्यात आला होता. अनेक वस्तू स्वस्तात मिळणार असल्याने उद्घाटनाच्या दिवशीच सहस्रो लोक मॉलबाहेर गोळा झाले होते. मॉलच्या सुरक्षारक्षकांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने काही वेळातच ही गर्दी दुकानात घुसली. अधिक गर्दी होऊ नये; म्हणून मॉलचे दार बंद करण्यात आल्यावर बाहेरील जमावाने दार तोडून आत प्रवेश केला. येथील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने काही वेळ वाहतूकही ठप्प झाली होती.

मॉलच्या मालकाने सांगितले की,  आम्ही हा मॉल कराचीच्या लोकांच्या लाभासाठी चालू केला. वर्षभर वस्तूंच्या किमती तेवढ्याच रहाणार होत्या. हा मॉल चालू करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेतले होते; मात्र लोकांनी आम्हाला अशी वागणूक दिली. पाकिस्तानात फार कमी जण गुंतवणूक करत आहेत. लोकांच्या हितासाठी जर कुणी काही गुंतवणूक करत असेल, तर लोकांनीही सामंजस्य दाखवायला हवे.

संपादकीय भूमिका

लुटारू पाकिस्तानी ! जगामध्ये भिकेचे भांडे घेऊन फिरणार्‍या पाकिस्तानी लोकांची मानसिकता कशी झाली आहे ?, हे या घटनेवरून लक्षात येते !