गणेशोत्सव मंडळांसाठी ध्वनीप्रदूषणाचे नवीन नियम !
पुणे – मंडपात २ ठिकाणी ‘डिजिटल डिस्प्ले बोर्डा’वर आवाजाची पातळी आणि मर्यादा नमूद असावी. तसेच त्यावर ध्वनीप्रदूषण आरोग्यासाठी हानीकारक असल्याची वैधानिक चेतावणी असावी. विसर्जन मिरवणुकीत प्रमुख चौकांमध्ये आवाजाचे ‘रिअल टाइम’ निरीक्षण करावे, अशा सूचना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एन्.जी.टी.ने) गणेशोत्सव मंडळांना केले आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या वेळी ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी न्यायाधिकरणाने ३० ऑगस्टला नवीन नियम घालून दिले. नियमांचे पालन करण्याचे दायित्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलीस यांवर आहे. न्यायाधिकरणाचे न्यायिक सदस्य दिनेशकुमार सिंह आणि तज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणी श्रवणतज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी अधिवक्ता मैत्रेय घोरपडे यांच्या माध्यमातून प्रविष्ट केलेली याचिका निकाली काढतांना न्यायाधिकरणाने हे नवीन नियम घालून दिले आहेत.
पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत विचारविनिमय करून गणेशोत्सव मंडळांना अधिकाधिक १०० वॅट क्षमतेपर्यंत ध्वनीयंत्रणेला अनुमती देण्याचा विचार करावा, तसेच गणेशोत्सव मंडळांनीही ध्वनीयंत्रणेची अनुमती मागतांना ध्वनीक्षेपकांची संख्या आणि क्षमता नमूद करावी.