जालना – मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यातील पांगरी गावचा लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे गावाच्या दोन्हीही बाजूने असलेल्या नद्यांच्या पाण्याने गावकर्यांना वेढले होते; परिणामी रात्री गावकर्यांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले.
धाराशिव – जिल्ह्यातील तेरणा नदीकाठच्या परिसरात मोठा पाऊस झाला. १६ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक अतीवृष्टी झाली. कळंब तालुक्यातील इटकूर मंडळात सर्वाधिक १५० मिलीमीटर इतका पाऊस झाला. ऐन पोळ्याच्या दिवशी अनेकांची तारांबळ उडाली. तेरणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेची चेतावणी दिली.
कळंब शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी २ दिवस झालेल्या पावसामुळे तेरणा परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहिले. तेरणा धरणातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या वेगात पाण्याचा विसर्ग चालू आहे. परिणामी तेर गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक छोटेमोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे शेतात पाणी साठून खरीप पिकांची हानी झाली आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शासन आणि विमा आस्थापन यांना हानीची माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे.
धुळे – शिरपूर तालुक्यात, तसेच अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. धरणांचे १० दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत अनेर धरणांतून पंधरा सहस्र ८८० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे १० दरवाजे उघडले. १ लाख ३५ सहस्र क्युसेक्स पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग होत आहे. जिल्ह्यातील २६ मंडळात अतीवृष्टीची नोंद झाली आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वहात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
अकोला – तालुक्यातही जोरदार पाऊस चालू आहे. काटेपूर्णा धरणात पाण्याची आवक होत असून धरण भरले आहे. त्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.
परभणी – येथे मुसळधार पावसामुळे बस वाहून गेली. जिल्ह्यातील करापरा नदीला पूर आल्याने अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. सोयाबीन, कापूस पिकात पाणी साचल्याने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. बीड शहराला पाणीपुरवठा करणार्या बिंदुसरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून लवकरच गोदापात्रात मोठा विसर्ग करण्यात येणार आहे. पुरामुळे परभणी-जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली.
नांदेड – जिल्ह्यातील लिंबोटी धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. मनार नदीत पाण्याचा विसर्ग चालू आहे. मनार नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसना नदीला पूर आला आहे. त्यामुळे जवळपास ५० गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने स्थानिकांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. काटेपूर्णा धरण ७६ टक्के भरले, धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. शहरातील अनेक भागांतील नागरिकांच्या घरांत पाणी शिरले.
मराठवाडा – छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव येथे ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. हिंगोली विभागात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक धरणांची पाणीपातळी वाढली असून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहाण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
नागपूर – सुरत राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला. व्यारा बायपास मार्गावर पाणी भरल्याने वाहतूक ठप्प होती.
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील देवजना गावातील ४० शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. १ सप्टेंबरच्या रात्रीपासून हे गाव पाण्याखाली आहे. मराठवाडा आणि विदर्भ यांना जोडणारा यवतमाळ येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.