Raj Thackeray : महापुरुषांचे पुतळे आणि स्मारके, ही केवळ राजकीय सोय बनली आहे ! – राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे स्मारक म्हणजे कुठला तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गड-दुर्ग हे आहेत. महापुरुषांचे पुतळे आणि स्मारके ही केवळ राजकीय सोय बनली आहे, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून केले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मालवण येथील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा पडल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारलेला महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा असा कोसळतोच कसा ? मुळात ज्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची पडताळणी केली होती कि नव्हती ?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करायचे, मते मागायची, सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांच्या निविदा काढायच्या. त्यातून काही मिळते का ?, ते बघायचे. इतकेच राहिले आहे. प्रतीकांचे राजकारण करणारी ही व्यवस्था लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे. तसे झाले, तरच ‘आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात रहातो’, असे म्हणू शकतो.