‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘उपासना करतांना उपासकाला आनंद आणि शांती यांची अनुभूती येण्यासाठी त्याचा उपास्य देवतेप्रती भाव जागृत होणे महत्त्वाचे असते. उपासनेतील उपास्य देवतेच्या चित्रात देवतेचे तत्त्व (तारक रूप असल्यास सात्त्विकता) जेवढे अधिक प्रमाणात असते, तेवढे ते चित्र उपासकाला त्या देवतेचे तत्त्व ग्रहण करण्यास अधिक उपयुक्त ठरते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-चित्रकारांनी काढलेली श्री गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, श्री दत्त, शिव, श्री लक्ष्मी आणि श्री दुर्गा या देवतांची चित्रे सनातन संस्थेने प्रकाशित केली आहेत. या चित्रांमध्ये त्या त्या देवतांचे तत्त्व आले आहे. वर्ष २००० ते २०१९ या कालावधीत देवतांच्या चित्रांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार सांगितलेले पालट करण्यात आले. वर्ष २०१९ मधील सनातन-निर्मित देवतांच्या ८ सात्त्विक चित्रांतील सरासरी सात्त्विकतेचे प्रमाण सरासरी ३१ टक्के एवढे झाले आहे. सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे विविध आकारांतही उपलब्ध आहेत.
सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या विविध आकारांतील चित्रांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी जानेवारी २०२० मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाने वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येतात.
१. सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या विविध आकारांतील सात्त्विक चित्रे
श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्रांचे विविध आकार पुढे दिले आहेत. या सर्व चित्रांमध्ये ३१ टक्के सात्त्विकता आहे.
अ. लहान आकाराचे चित्र (२ x ३ इंच) : हे चित्र आकाराने लहान असल्याने व्यक्तीला स्वतःजवळ (खिशात अथवा पाकिटात) ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
आ. मध्यम आकाराचे चित्र (५ x ७ इंच) : मध्यम आकाराचे चित्र व्यक्तीला तिच्या घरातील देवघरात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
इ. मोठ्या आकाराचे चित्र (८ x १० इंच) : मोठ्या आकाराचे चित्र व्यक्तीला तिच्या घरातील देवघरात, तसेच ध्यानमंदिरात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
ई. १४ x १९ इंच आकाराचे मोठे चित्र : सत्संग किंवा प्रवचने आयोजित केली जातात त्याठिकाणी ठेवण्यासाठी हे चित्र उपयुक्त आहे.
उ. २० x २७ इंच आकाराचे मोठे चित्र : समष्टीतील धर्मसभा इत्यादी मोठ्या उपक्रमांच्या ठिकाणी ठेवण्यासाठी हे चित्र उपयुक्त आहे.
२. चाचणीतील नोंदींचे विवेचन
सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या विविध आकारांतील चित्रांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या नोंदी पुढे दिल्या आहेत.
२ अ. सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या विविध आकारांतील सात्त्विक चित्रांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे : सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या विविध आकारांतील पाचही चित्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. चित्रांच्या आकारानुरूप त्यांतील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर अधिक आहे. २० x २७ इंच आकाराच्या मोठ्या चित्रात सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आहे. हे पुढे दिलेल्या नोंदींतून लक्षात येते.
३. चाचणीतील नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक-चित्रकारांना काळानुसार केलेल्या मार्गदर्शनामुळे सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांमध्ये सरासरी ३१ टक्के एवढी सात्त्विकता येणे : स्पंदनशास्त्रानुसार एखाद्या देवतेचे चित्र किंवा मूर्ती तिच्या मूळ रूपाशी जेवढी अधिक मिळती-जुळती असेल, तेवढी त्या चित्रात किंवा मूर्तीमध्ये त्या देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात आकृष्ट होतात. चित्रातील देवतेचा आकार, तिचे अवयव, तिच्या अंगावरील अलंकार, तिची शस्त्रे इत्यादी घटक देवतेच्या प्रत्यक्षातील त्या त्या घटकांशी किती प्रमाणात जुळतात, यावरून त्या चित्राची एकूण सत्यता ठरते. देवतेचे चित्र काढून झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या चित्राची सात्त्विकता सूक्ष्मातून जाणून ती टक्क्यांमध्ये सांगितली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक-चित्रकारांना काळानुसार केलेल्या मार्गदर्शनाचे फलित म्हणजे देवतेच्या चित्रातील सात्त्विकतेचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले. या कलियुगात सर्वसामान्य मनुष्याने निर्माण केलेल्या देवतेच्या एखाद्या कलाकृतीत, म्हणजे चित्र किंवा मूर्ती यामध्ये अधिकाधिक ३० टक्के सात्त्विकता, म्हणजे सत्यता येऊ शकते. वर्ष २०१९ मधील सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांमध्ये त्याहून अधिक (३१ टक्के) सात्त्विकता येणे, हा सनातनच्या साधक-चित्रकारांच्या उच्चतम भावावस्थेचा परिणाम आहे.
३ आ. सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्रांच्या आकारानुरूप त्यांतील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर अधिक असणे : देवतेच्या चित्राच्या आकारावर त्यातून प्रक्षेपित होणारी स्पंदने किती दूरपर्यंत प्रक्षेपित होऊ शकतात, हे ठरते. यामुळे चित्राचा आकार जेवढा लहान किंवा मोठा असेल त्याप्रमाणात त्यातून प्रक्षेपित होणारी स्पंदने अल्प किंवा अधिक दूरपर्यंत प्रक्षेपित होतात. सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्रांमध्ये सात्त्विकता सरासरी३१ टक्के आहे. त्यामुळे श्रीकृष्णाच्या पाचही आकारांतील चित्रांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली आणि त्यांचे प्रमाण चित्रांच्या आकारांनुरूप उत्तरोत्तर अधिक आहे.
३ इ. सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या २० x २७ इंच आकाराच्या मोठ्या चित्रामध्ये सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असण्याचे कारण : चाचणीतील श्रीकृष्णाच्या एकूण ५ चित्रांपैकी पहिल्या ४ चित्रांमध्ये श्रीकृष्णाचे चित्र जानूपर्यंत (गुडघ्यापर्यंत) असल्याने त्याचे चरण दिसत नाहीत, तर २० x २७ इंच आकाराच्या चित्रात श्रीकृष्णाचे चरणांपर्यंतचे म्हणजे पूर्ण रूप दिसते. २० x २७ इंच आकाराच्या चित्राचा आकार पुष्कळ मोठा असल्याने आणि त्यामध्ये देवतेचे चरणही दिसत असल्यामुळे अन्य चित्रांच्या तुलनेत या चित्रातून सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित झाली.
३ ई. सनातन-निर्मित श्रीकृष्णाची सात्त्विक चित्रे श्रीकृष्णतत्त्व आकृष्ट करण्यासह उपासकामध्ये भावनिर्मिती होण्याच्या दृष्टीने अत्यंत पूरक असणे : परात्पर गुरु डॉक्टरांचा देवतांची सात्त्विक चित्रे निर्माण करण्यामागील प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे होता – ‘देवतेच्या चित्रामध्ये तिचे अधिकाधिक तत्त्व आकृष्ट होऊन समाजाला (उपासकाला) त्याचा लाभ व्हावा. तसेच देवतेप्रती उपासकामध्ये भाव निर्माण व्हावा.’ देवतेच्या चित्रामुळे, म्हणजे तिच्या सगुण रूपामुळे उपासकाला उपास्य देवतेशी अनुसंधान साधणे सुलभ होते आणि देवतेप्रती त्याच्यामध्ये भाव निर्माण होण्यास साहाय्य होते. पुढे जसजसा उपासकाचा भाव वाढेल, तसतसा त्याच्या भावामुळे देवतेच्या चित्रात चांगले पालट होऊ लागतील. उपासकाच्या भावामुळे देवतेच्या चित्रातील सात्त्विकतेत वाढ झाल्याने उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होईल. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी साधक-चित्रकारांना श्रीकृष्णाचे चित्र विविध आकारांत बसवतांना ‘श्रीकृष्णाचे मुख स्पष्ट दिसेल’, असे घेण्यास सांगितले. (लहान ते मध्यम आकारांच्या चित्रांमध्ये श्रीकृष्णाचे पूर्ण रूप म्हणजे चरणांपर्यंत घेतल्यास देवाचे मुख लहान आणि अस्पष्ट दिसते. त्यामुळे श्रीकृष्णाचे जानूपर्यंतचे (गुडघ्यापर्यंतचे) चित्र घेण्यात आले. यात देवाचे चरण दिसत नाहीत; पण मुख स्पष्टपणे दिसते.) थोडक्यात, सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या विविध आकारांतील (चाचणीतील पहिल्या चार आकारांतील) सात्त्विक चित्रे ‘श्रीकृष्णतत्त्व’ आकृष्ट करण्यासह उपासकामध्ये भावनिर्मिती होण्याच्या दृष्टीने अत्यंत पूरक आहेत.
टीप – भगवान श्रीकृष्ण पूर्णावतार आहे. त्यामुळे त्याचे चित्र पूर्ण (म्हणजे चरणांपर्यंत) न घेता जानूपर्यंत (गुडघ्यापर्यंत) घेतले तरी त्यातून श्रीकृष्णतत्त्वाची स्पंदने प्रक्षेपित होतात. अन्य देवतांची चित्रे मात्र पूर्ण (म्हणजे चरणांपर्यंत) घेणे आवश्यक असते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.३.२०२०)
ई-मेल : [email protected]
|