सांगली येथील रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या विरोधात ‘हंटर फोड आंदोलन’ करून जाब विचारणार ! – नितीन शिंदे, माजी आमदार

३० ऑगस्टला मोर्चा !

सांगली, २१ ऑगस्ट (वार्ता.) – येथील चिंतामणीनगरमधील रेल्वे उड्डाणपुलाचे काम करणार्‍या ठेकेदाराला १ नाही ३ वेळा मुदतवाढ दिलेली आहे. तरीही हे काम पूर्ण होत नाही. रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या विरोधात रेल्वे अधिकार्‍यांना ‘हंटर फोड आंदोलन’ करून जाब विचारणार आहे. रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलापासून ते मार्केट यार्ड रेल्वेस्थानकापर्यंत ३० ऑगस्ट या दिवशी मोर्चा काढून हा जाब विचारू, अशी माहिती हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी २० ऑगस्ट या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सर्वश्री रामनिवास बजाज, योगेश देसाई, प्रकाश निकम, मनोज साळुंखे, अनिरुद्ध कुंभार, शैलेश पवार, अशोक गोसावी, सुदर्शन माने, सोमेश बाफना, बाळासाहेब कलशेट्टी आदी उपस्थित होते.

श्री. नितीन शिंदे पुढे म्हणाले की, उड्डाणपूल कामाला मुदतवाढ कुणी दिली ? मुदतवाढ देण्याचे अधिकार कुणाला आहेत ? या मुदतवाढीच्या काळात रेल्वे उड्डाणपुलाच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे व्यापारी, दुकानदार आणि जनता यांची कोट्यवधी रुपयांची हानी होणार आहे. या हानीला उत्तरदायी कोण ? आता दिलेली ३१ सप्टेंबर २०२४ च्या मुदतीपर्यंत हा पूल पूर्ण होणार आहे का ? आणि झाला नाही, तर काय कारवाई करणार ? याचा जाब रेल्वे अधिकार्‍यांना विचारला जाईल. रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाच्या विरोधात आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या बैठका घेणार आहे.

या वेळी बोलतांना ‘माधवनगर व्यापारी असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. प्रदीप बोथरा म्हणाले की, रेल्वे पुलाच्या ठेकेदाराला कामासाठी मुदतवाढ कोण देत आहे ?  ठेकेदार काम कधी पूर्ण करणार आहे ? याचे स्पष्टीकरण देत नाही. या विरोधात रेल्वे प्रशासनाला जाब विचारणे आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज साळुंखे म्हणाले की, ५ किलोमीटरचा वळसा घालून जायला लागत असल्यामुळे जनतेला पेट्रोल डिझेलसाठी मोठा आर्थिक फटका बसत आहे.