छताचे प्लास्टर कोसळून तरुणाचा मृत्यू
ठाणे – भिवंडी येथील कारिवली भागातील घरामधील छताचे प्लास्टर अंगावर पडून किसन पटेल (वय १७ वर्षे) याचा मृत्यू झाला. ४ मजली इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील एका सदनिकेत किसन त्याच्या कुटुंबासमवेत भाड्याने वास्तव्यास होता. इमारत अतिशय जीर्ण झाल्याने येथील रहिवासी इमारत दुरुस्त करण्यासाठी मालकाला विनंती करत होते. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
एस्.टी.च्या ताफ्यात २ सहस्र ४७५ नव्या बसगाड्या !
मुंबई – एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात आता ‘टू बाय टू’च्या गडद लाल रंगाच्या २ सहस्र ४७५ नव्या बसगाड्या भरती होणार आहेत. त्यापैकी ३०० बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरच्या शेवटी येतील. एका बसची किंमत ३८ लाख २६ सहस्र रुपये आहे. ‘अशोक लेलँड’ या आस्थापनाने या बसची बांधणी केली आहे. एस्.टी. महामंडळाने या आस्थापनासमवेत नव्या बससाठी करार केला होता.
काळा घोडा परिसर होणार वाहनमुक्त क्षेत्र !
मुंबई – दक्षिण मुंबई परिसरातील काळा घोडा परिसर प्रथमच ‘फक्त पादचारी’ झोनमध्ये पालटणार आहे. सप्टेंबरपासून त्याची कार्यवाही होणार असून त्यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्न करत आहे. हा महानगरपालिकेचा काळा घोडा सुशोभीकरण योजनेचा एक भाग आहे. काळा घोडा हे शनिवार आणि रविवारी सायंकाळी मुंबईतील पहिले वाहनमुक्त पादचारी क्षेत्र ठरणार आहे. या संकल्पनेची ओळख करून देण्यासाठी आठवड्यातील २ दिवस प्रायोगिक तत्त्वावर ती राबवण्यात येईल.
तरुणीसमवेत अश्लील चाळे करणार्या वृद्धावर गुन्हा नोंद !
पेण (जिल्हा रायगड) – येथे सुबोध जोशी (वय ६२ वर्षे) या वृद्धाने २२ वर्षीय तरुणीसमवेत अश्लील चाळे केले. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
तरुणास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा !
अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमीष दाखवून पळवून नेल्याचे प्रकरण
पुणे – अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमीष दाखवून पळवून नेल्याच्या प्रकरणी विनोद उपाख्य विनायक चव्हाण याला ६ महिने सक्तमजुरी आणि १५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ३ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल. दंडाच्या रकमेतील १० सहस्र रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस्.आर्. नरवडे यांच्या न्यायालयाने दिले आहेत. ही घटना २२ ऑक्टोबर २०११ या दिवशी घडली होती.