Bangkok Bangladesh Hindus Protest : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात बँकॉक (थायलंड) येथे निदर्शने !

बँकॉकमधील बांगलादेशाच्या दूतावासासमोर आंदोलन करतांना हिंदू

बँकॉक (थायलंड) – बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात विविध संघटनांच्या ३०० हून अधिक सदस्यांनी बँकॉक शहरातील बांगलादेशाच्या दूतावासासमोर निदर्शने केली. या आंदोलनामध्ये विश्‍व हिंदु परिषद, हिंदु स्वयंसेवक संघ, विष्णु मंदिर, सत्य साई फाऊंडेशन, गीता आश्रम इत्यादींसह काही आंतरराष्ट्रीय संघटनाही सहभागी झाल्या होत्या. बांगलादेशात हिंदु आणि अन्य अल्पसंख्याक समुदाय यांच्यावर चालू असलेल्या अत्याचारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

बांगलादेशाच्या दूतावासाचे प्रभारी अधिकारी हसनत अहमद (उजवीकडून तिसरे) यांना निवेदन देतांना हिंदु संघटनांचे सदस्य

बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या चळवळीने इस्लामी रूप धारण केले असून मूळ बांगलादेशी नागरिक असलेल्या हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशाच्या सत्ताधार्‍यांनी अल्पसंख्यांकावर होणारा अत्याचार त्वरित थांबवावा, पीडितांना न्याय मिळवून द्यावा आणि देशाच्या इतर नागरिकांसारखे अधिकार त्यांना द्यावेत, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. हिंदु मंदिरांवरील आक्रमण, हिंदूंचा नरसंहार, हिंदु महिलांवरील बलात्कार आणि क्रूर हत्या इत्यादी घटनांविषयी आंदोलकांनी आवाज उठवला.

आंदोलकांनी बांगलादेशाच्या दूतावासाचे प्रभारी अधिकारी हसनत अहमद यांची भेट घेतली आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांना भेडसावणार्‍या गंभीर समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी करणारे एक निवेदन त्यांना सुपुर्द केले. विश्‍व हिंदु परिषदेचे आश्रयदाते श्री. सुशील सराफ, सचिव श्री. जय शंकर, गीता आश्रमचे श्री. दिनेश पांडे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.