महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंद आणि हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन !

बांगलादेशातील निष्पाप हिंदूंवरील अत्याचाराचे प्रकरण

बंदला विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, समविचारी राजकीय पक्ष यांनी पाठिंबा दिला होता.

मुंबई – बांगलादेशातील हिंदू, तसेच मंदिरे यांवर झालेली आक्रमणे, मूर्तींची करण्यात आलेली तोडफोड, महिलांवरील अत्याचार या सर्व प्रकरणांविरोधात सरकारने तातडीने पावले उचलावीत, या निमित्ताने सकल हिंदु समाजाच्या वतीने राज्यभरात अनेक ठिकाणी बंदची हाक पुकारण्यात आली होती. दुकानदार, व्यापारी यांनी त्यांची दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. काही ठिकाणी हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

जळगाव आणि नाशिक येथे  बंद १०० टक्के यशस्वी झाला. सोन्याची व्यापारपेठसुद्धा बंद होती.

नाशिक

हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूंना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर आंदोलन करत असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले.

नंदुरबार

येथे अत्यावश्यक सुविधा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यात मोठ्या प्रमाणात हिंदु नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. येथील शहादामध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

• दर्यापूर (अमरावती) येथेही हिंदूंनी बंद पाळला.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ‘इचलकरंजी बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

इचलकरंजी बंदच्या कालावधीत शहरातील बंद ठेवण्यात आलेली दुकाने

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ, तसेच देशातील हिंदूविरोधी कारवाया यांच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘इचलकरंजी बंद’ला १६ ऑगस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व दुकाने, वाहतूकदार, शाळा, बाजार यांसह सर्वांनी त्यांचे उद्योग-व्यवसाय बंद ठेवून हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या सहवेदनेत तेही सहभागी आहेत, हे कृतीतून दाखवून दिले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपाशी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोरदार घोषणा दिल्या. या प्रसंगी अमृत भोसले, प्रवीण सामंत, सुजित कांबळे, प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, कपिल शेटके, अरविंद शर्मा, सर्जेराव कुंभार यांसह अन्य उपस्थित होते. सायंकाळी मुख्य मार्गावर भव्य अशी मानवी साखळी करण्यात येऊन बंदची सांगता झाली.


पुणे येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने १८ ऑगस्टला चिंचवड शहरात विशाल ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’चे आयोजन !

चिंचवड (जिल्हा पुणे), १६ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशातील निष्पाप हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार, अमानुष हत्या, तसेच हिंदु मंदिरांवरील आक्रमणांच्या निषेधार्थ आणि तेथील हिंदूंच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागणीसाठी ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने शहरात ‘विशाल हिंदु जनगर्जना मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. १८ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे पुतळा चौक, चिंचवड स्टेशन येथून या मोर्चाला आरंभ होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, पिंपरी येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चात शहरातील समस्त हिंदु बांधव, भगिनी आणि संघटना यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदु समाज, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका :

उद्या बांगलादेशासारखी स्थिती भारतातही होऊ शकते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मोर्च्याच्या माध्यमातून झालेले संघटन पुढे तसेच ठेवावे !