उद्या १८ ऑगस्ट या दिवशी ‘श्रावणी’ (जानवे पालटण्याचा दिवस) आहे. त्या निमित्ताने…
जानव्याला पहिल्या तंतूवर (धाग्यावर) ॐकार असतो. दुसर्यावर अग्नि असतो. तिसर्यावर नवनाग असतो. चौथ्यावर सोम, पाचव्यावर पितर, सहाव्यावर प्रजापती, सातव्यावर वायू, आठव्यावर सूर्यनारायण आणि नवव्यावर विश्वदेव असतो. जानव्याच्या ३ तंतूंचे पिळ असतात, असे एकूण ९ दोरे असतात. असे ९ सूत्रींचे (तंतू) ३ पदर, म्हणजेच सत्त्व, रज आणि तम, हे ३ गुण मिळवून ९६ अंगुळे दोरा लांब (९६ बोटे लांब) असतो.
९६ चौंगे (एक चौंगा म्हणजे चार अंगुळे) लांबी असलेल्या सूतास कुठेही न तोडता त्रिगुणीकरण करून त्यास ब्रह्मगाठ मारून यज्ञोपवीत म्हणजेच जानवे सिद्ध केले जाते. यात सूत म्हणजेच सूक्ष्मतंतू किंवा मुख्य धागा होय. देवतान्यास करतांना तंतू हाच शब्द वापरतात.
‘जानवे हे बेंबीपर्यंतच असावे. कमरेच्या खाली जाऊ नये’, असा संकेत आहे. ३ पदरावर ३ वेद आणि ब्रह्मगाठीवर अथर्ववेद असतो, अशी संकल्पना आहे, तसेच सामुद्रिक शास्त्रात पुरुषाचे प्रमाण स्वत:च्या अंगुळांनी ८४ ते १०८ पर्यंत असते. त्यांची सरासरी ९६ अंगुळे येते. खांद्यापासून बेंबी किंवा कमरेपर्यंत साधारणपणे ३२ अंगुळे अशी येते. ३ पदर गृहित धरून ती ९६ अंगुळे अशी आणि सलग धागा (न तोडता) पकडला, तर ९६ चौंगे असे माप येते.
सविस्तर सांगावयाचे झाले, तर तंतू हाच शब्द योग्य आहे; परंतु आपण काही लोक त्याला पदर, दोरा, सूत असे नावाने सुद्धा ओळखतो, म्हणजे एका जानव्यात ९ तंतू. ३ तंतूंचा एक पदर. याप्रमाणे एक जानवे ३ पदरी असते, त्यास ‘यज्ञोपवीताचे त्रिसूत्रीकरण’, असे म्हणतात. प्रत्येक पदरास एक गाठ असते, त्यास ‘ग्रंथी’ म्हणतात. देवतान्यास करतांना ९+३ असे १२ मंत्र म्हणतात. नंतर त्याची ब्रह्मगाठ दिलेली असते. ही अद्वैताची गाठ, म्हणजे जीव आणि ब्रह्म एकच आहे हा सिद्धांत ! म्हणून जानवे घालणे, हे शास्त्रीय प्रतीक आहे.
उपनयन (व्रतबंध) संस्कारातील एक महत्त्वाचे अंग असलेले जानवे हे प्रतिज्ञाबद्धतेचे प्रतीक आहे. प्रत्येक सूत्र हे कुणा ना कुणासाठी असलेल्या प्रतिज्ञेचा संस्कार आहे – ज्ञान, माता-पिता आणि धर्म. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली या जानव्याला ‘ज्ञानेश्वरी’त नवरत्नाच्या हाराची उपमा देतात.
तो गुण नवरत्नाकारू । यया नवरत्नाचा हारू ।
न फेिडतले दिनकरू । प्रकाश जैसा ।।
– श्री. किरण तेलंग
(साभार : श्री गोंदवलेकर महाराज फेसबुक)