सातारा, १२ ऑगस्ट (वार्ता.) – येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव साजरा केला जावा, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित आली. ही बैठक राजवाडा येथील समर्थ सदन येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी गणेशोत्सव मंडळांना कायदेशीर साहाय्य करण्याचे अधिवक्ता जनार्दन करपे यांनी घोषित केले.
या वेळी ‘गणेशोत्सव वास्तव आणि आदर्श’, तसेच ‘हलाल प्रमाणपत्र’ याविषयी ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आल्या. याविषयी ‘श्री दुर्गामाता मंदिरा न्यासा’चे सचिव तथा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा निमंत्रक श्री. शिवाजीराव तुपे यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले की, गणेशोत्सव मंडळांनी संघटित होणे, समाजाला दिशादर्शन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच आदर्श मिरवणूक काढावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आयोजित होणारे व्याख्याने आणि इतर कार्यक्रम समाजाला सात्त्विकतेकडे नेणारे असावेत.
हिंदु जनजागृती समितीचे सातारा जिल्हा समन्वयक श्री. हेमंत सोनवणे म्हणाले की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी घरातील गणपति रस्त्यावर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात आणून हिंदु समाजाला सामूहिक उपासना करायला लावली. यातूनच भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा मार्ग सुकर झाला.
या बैठकीमध्ये राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील प्रवचनांचे आयोजन करणे, पारंपरिक वेशभूषा परिधान मिरवणूक काढणे, डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा उपयोग करणे इत्यादी ठराव करण्यात आले.
बैठकीला उपस्थित मान्यवर
श्री प्रतापसिंह गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. धनंजय देशमुख, श्री ढोल्या गणपति मंडळाचे श्री. ओंकार जगताप, श्री मंगल मारुति मंडळाचे श्री. नितीन नारकर, पद्मावती प्रतिष्ठानचे श्री. जीवन शिंदे, श्री सोन्या मारुति मित्रमंडळाचे श्री. योगेश सुतार, तसेच सेवानिवृत्त सैन्याधिकारी, अधिवक्ता, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि गणेशभक्त उपस्थित होते.