वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १० लाख ६७ सहस्र निरक्षर !
पुणे – राज्यात योजना संचालनालयाकडून ‘नवसाक्षरता अभियान २०२३-२४’ पासून राबवण्यात येत आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात १ कोटी ६३ लाख निरक्षर आढळून आले. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १० लाख ६७ सहस्र निरक्षर आहेत; मात्र पुणे जिल्ह्याने निरक्षरांना साक्षर करण्यासाठीच्या नवसाक्षरता अभियानाकडे पूर्णत: पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. २०२४-२५ मध्ये राज्याकडून पुणे जिल्ह्याला ३८ सहस्र ३८ निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र ८ ऑगस्टपर्यंत केवळ ६३ निरक्षरांचीच नोंदणी झाली असून निरक्षरांना शिकवण्यासाठी आवश्यक ३ सहस्र ८०८ स्वयंसेवकांपैकी केवळ २२ स्वयंसेवकांचीच नोंदणी झाली आहे.
गेल्या वर्षी पुणे जिल्ह्याला मिळालेल्या ६३ सहस्र ९५० निरक्षरांच्या उद्दिष्टापैकी केवळ १२ सहस्र ६८४ निरक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली. त्यातील ९ सहस्र ४२ उत्तीर्ण झाले. त्यामुळे गेल्या वर्षीची उद्दिष्टपूर्ती साध्य झालेली नसतांना आता नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यालाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून नवसाक्षरता अभियनाच्या जागृतीविषयी योजना संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून लक्ष वेधले आहे.
संपादकीय भूमिकाविद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात सर्वाधिक निरक्षर असणे लज्जास्पद ! |